मसाला दुधातून विषबाधा; सोलापुरातील विवाहितेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:22 PM2019-11-21T12:22:49+5:302019-11-21T12:26:18+5:30
पती-पत्नी फिरायला गेले अन् असं घडलं !
सोलापूर : फिरायला बाहेर गेल्यानंतर मसाला दूध पिल्याने विषबाधा होऊन विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी ७ वाजता घडला. या प्रकरणी संशय व्यक्त करीत विवाहितेच्या वडिलांनी याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात केली आहे.
भावना राजशेखर किणगी (वय २४, रा. विद्यानगर, शेळगी, सोलापूर) असे विषबाधा होऊन मरण पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. भावना किणगी ही पती राजशेखर किणगी यांच्यासोबत मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बाहेर फिरायला गेली होती. दरम्यान, दोघांनी एका ठिकाणी मसाला दूध पिऊन घरी आले. घरी आल्यानंतर भावना किणगी हिला अचानक त्रास होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे पती राजशेखर किणगी यांनी भावनाला रात्री १0.३0 वाजता कन्ना चौकातील कृष्णा हॉस्पिटल येथे अॅडमिट केले.
डॉक्टरांनी तपासल्यानंतर भावनाला अन्नातून विषबाधा झाली असल्याचे सांगितले. रात्री भावना शुद्धीवर आली, ती भाऊ गुरूशांतय्या हिरेमठ याला बोलली. पहाटे ५ वाजता गुरूशांत हिरेमठ हा सुनीलनगर येथील घरी आंघोळीसाठी गेला होता. मात्र ७.४५ वाजता दवाखान्यातून बहीण भावना हीचे निधन झाल्याचे फोन आला. गुरूशांतय्या यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली़ त्यांनी तत्काळ द्यावतंगी (ता. आळंद, जि. कलबुर्गी) येथील आपल्या आई-वडिलांना याची माहिती दिली. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
चौकशी करून न्याय द्या, पित्याने केली विनंती...
- भावना हिचे लग्न अडीच वर्षांपूर्वी राजशेखर किणगी यांच्यासोबत झाले होते. घरामध्ये सासरा व हे दोघे पती-पत्नी राहतात. पहिले सहा महिने तिला चांगले नांदविण्यात आले, त्यानंतर पती-पत्नीमध्ये भांडणे झाली होती. समजावून सांंगितल्यानंतर राजशेखर यांनी नांदविण्याची तयारी दर्शवली होती. दुधातून विषबाधा झाल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. पहाटे ५ वाजेपर्यंत ती चांगली होती, त्यानंतर अवघ्या दोन तासांत तिचे निधन झाले. विषबाधा झाल्याने तिचा मृत्यू झाला असून याची चौकशी करावी. खºया गुन्हेगाराचा शोध लागावा अशी लेखी तक्रार वडील शिवानंद मठपती यांनी केली आहे.