शिळ्या अन्नातून ५५ मेंढ्यांना विषबाधा
By admin | Published: June 2, 2014 12:31 AM2014-06-02T00:31:34+5:302014-06-02T00:31:34+5:30
चांडोलेवाडी-सरगरवस्ती; २० मेंढ्यांचा मृत्यू, ३५ मेंढ्या अत्यवस्थ
सांगोला : दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या लग्न समारंभातील उघड्यावर टाकलेले शिळे अन्न खाऊन विषबाधा झाल्याने चांडोलेवाडी-सरगरवस्ती (सांगोला) येथील दोन मेंढपाळांच्या २० मेंढ्या उपचारापूर्वीच जागीच मरण पावल्या. पशुवैद्यकीय अधिकार्यांनी ५५ पैकी ३५ अत्यवस्थ मेंढ्यांवर तातडीने उपचार केल्यामुळे वाचविण्यात यश आले आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी (१ जून) सकाळी ९ वा.च्या सुमारास घडली असून, मेंढपाळांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चांडोलेवाडी येथील राजाराम शामराव सरगर व महादेव तुकाराम कोळेकर यांचा मेंढपाळचा व्यवसाय असून, राजाराम सरगर यांच्याकडे ४० तर महादेव कोळेकर यांच्याकडे १५ मेंढ्या आहेत. शुक्रवारी येथील लग्नसमारंभात शिल्लक मिष्टान्न चांडोलेवाडी नजीक उघड्यावर टाकून दिले होते. शनिवारी सरगर व कोळेकर यांच्या मेंढ्या नेहमीप्रमाणे चरत जात असताना नेमक्या उघड्यावर पडलेल्या मिष्टान्नावर तुटून पडल्या. दरम्यान रात्रीच्या सुमारास ५५ मेंढ्यांना गुळण्या होऊ लागल्या. या घटनेत रविवारी सकाळी ५५ मेंढ्यांपैकी २० मेंढ्या उपचारापूर्वी जागीच मरण पावल्या. तर ३५ मेंढ्या विषबाधेमुळे अत्यवस्थ आहेत. कोळेकर व सरगर यांनी तातडीने सांगोला येथील पशुवैद्यकीय अधिकार्यास पाचारण करून ३५ मेंढ्यांवर वैद्यकीय उपचार केले. ठार झालेल्या मेंढ्यांमध्ये राजाराम सरगर यांच्या १५ मेंढ्या तर महादेव कोळेकर यांच्या ५ मेंढ्या जागीच मरण पावल्या. ३५ जखमी मेंढ्यांवर पशुवैद्यकीय अधिकारी एच. डी. पठाण यांनी उपचार केले आहेत. गारपीट, वादळी पाऊस या संकटाला समोरे जाता जाता आता शेतकर्यांना विषबाधेच्या संकटाला सामोरेजावे लागत आहे
. ---------------------------
मेंढपाळांवर आघात
राजाराम सरगर व महादेव कोळेकर या दोन मेंढपाळांच्या घरची परिस्थिती हलाखीची असून, त्यांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून होता. ठार झालेल्या मेंढ्यांची प्रत्येकी ५ ते १० हजार रुपये किंंमत असल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
------------------
मृत, जखमींचा पंचनामा
सांगोला मंडल अधिकारी हरीभाऊ चांडोले यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत व जखमी मेंढ्यांचा पंचनामा केला असून, अहवाल तहसीलकडे सादर केला आहे. घटनास्थळी तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी भेट देऊन या घटनेबाबत नैसर्गिक आपत्तीतून मदत करणे शक्य नसले तरी आम्ही शासकीय कर्मचार्यांच्या वेतनातून मेंढपाळांना आर्थिक सहाय्य करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.
----------------------
- शिळे अन्न खाल्ल्यामुळे जनावरांचे पोट फुगून गुळणी होऊन त्या जागेवर मृत पावतात. या दृष्टीने शेतकर्यांनी यापुढे जनावरांना कोणत्याही प्रकारचे शिळे अन्न देऊ नये. या घटनेत विषबाधित झालेल्या ५५ पैकी २० मेंढ्या मृत पावल्या असून, ३५ मेंढ्यांवर उपचार सुरु आहेत, - एच.डी.पठाण वैद्यकीय अधिकारी, सांगोला.