सोलापुरात आढळला आशिया खंडातील विषारी दुर्मीळ पोवळा साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:04 PM2020-12-02T17:04:59+5:302020-12-02T17:05:59+5:30
या सापाच्या दंशावर लस अद्यापही उपलब्ध नाही; आशिया खंडातील विषारी सापांपैकी सर्वात लहान साप
सोलापूर : पंधे कॉलनी येथील शरण अळळीमोरे यांच्या घरात अतिशय दुर्मीळ असलेला ‘पोवळा’ साप आढळून आला. या सापाबाबत अधिक माहिती नसल्याने मित्र सोमेश्वर पाटील यांच्या मदतीने सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना व्हाॅट्सॲपद्वारे माहिती दिली. त्यांनी हा साप अतिविषारी पोवळा असल्याचे सांगितले व या सापाला न डिवचता लांबून लक्ष ठेवण्यास सांगितले. काही क्षणातच घटनास्थळाहून या सापास निसर्गात मुक्त करण्यात आले.
पोवळा साप आशिया खंडातील विषारी सापांपैकी सर्वात लहान साप आहे. तोंड काळे, शरीराचा रंग तपकिरी, पोटाकडील भाग पोवळ्यासारखा नारंगी लाल, शेपटीवर दोन काळे ठिपके. डिवचला गेला असता शेपटी गोल करून शेपटीच्या खालील नारंगी भाग प्रदर्शित करून चावण्या आधीची चेतावणी देतो. हा साप अतिशय लहान असल्याने त्याचे विषदंत माणसाच्या रट्ट त्वचेत सहजासहजी टोचत नाहीत. म्हणून या सापाचे दंशाचे प्रमाण खूपच कमी आहे. विषदात त्वचेत खोलवर घुसले तर विषबाधा होऊ शकते.
महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, तामिळानाडू आणि कर्नाटकातील अनेक ठिकाणी त्याचा अधिवास आहे. जमिनीखाली, गवत किंवा दगडांच्या खाली तो वास्तव्यास असतो. या सापाच्या दंशावर लस अद्यापही उपलब्ध नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.