जिल्ह्यात पोलीस ॲलर्ट.. सहा देशी पिस्टल अन् ३५ जिवंत राऊंड जप्त
By विलास जळकोटकर | Published: April 22, 2024 05:22 PM2024-04-22T17:22:35+5:302024-04-22T17:23:26+5:30
सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांच्या पथकाला खब ऱ्याकडून गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार टेंभुर्णी येथील हॉटेलच्या परिसरात १९ एप्रिल रोजी सापळा लावण्यात आला, सायंकाळी दोघा संशयितांना ताब्यात घेतले.
सोलापूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस ॲलर्ट झाले असून, स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या टेंभुर्णी येथे टाकलेल्या धाडीमध्ये सहा देशी बनावटीचे पिस्टल आणि ३५ जिवंत राऊंड असा ३ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात चौघांना जेरबंद करण्यात आले. सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवून ही कारवाई केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांच्या पथकाला खब ऱ्याकडून गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार टेंभुर्णी येथील हॉटेलच्या परिसरात १९ एप्रिल रोजी सापळा लावण्यात आला, सायंकाळी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेण्यात आली. यात त्यांच्याकडूृन दोन अवैध देशी बनावटीचे पिस्टल, ९ जिवंत राऊंड मिळाले. त्यांच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात भारतीय हत्या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
अटक केलेल्या दोघांच्या कबुलीवरुन त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ३ पिस्टल, ९ जिवंत राऊंड जप्त केले. तसेच त्या तिघांनी पिस्टल विक्री केलेल्या एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १ गावठी पिस्टल आणि ७ जिवंत राऊंड जप्त करण्यात आले. अशी एकूण ६ पिस्टल आणि ३५ जिवंत राऊत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या हाती लागले. चौघांना जेरबंद करण्यात आले.
मध्यप्रदेशातील सीमेवरुन आणली पिस्टल
दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, ‘ आम्ही दोघे व आमचा अजुन एक मित्र असे तिघे काही दिवसांपूर्वी ऊस टोळी कामगार आणण्यासाठी धुळे जिल्ह्यात गेलो असता, तेथे आम्हास मध्यप्रदेश सीमेवरील उमरटी गावात देशी बनावटीचे पिस्टल व राऊंड विकत मिळत असल्याची माहिती मिळाली. तेथून ६ गावठी पिस्टल व ३५ जिवंत राऊंड लोकांना विक्री करण्यासाठी घेऊन आलो’ अशी कबुली दिली.