पोलिसही लुटणार होळीचा आनंद
By admin | Published: March 22, 2016 10:39 PM2016-03-22T22:39:14+5:302016-03-23T00:18:25+5:30
आजऱ्यातील उपक्रम : पोलिस ठाण्याच्या आवारात पेटणार होळी
ज्योतीप्रसाद सावंत --आजरा -सण, समारंभ म्हणजे पोलिस खात्याच्या कामात वाढ, ठिकठिकाणी बंदोबस्त, गस्त यामुळे मानसिक आणि शारीरिक तणाव. इतरत्र जल्लोष सुरू असताना ‘कर्तव्य’ बजावताना आपण सर्वांचा इतरांप्रमाणे आनंद लुटू शकत नाही, याची असणारी रुखरुख, याचा कामावर होणारा परिणाम यातून मार्ग काढण्यासाठी आजरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी यावर्षी पोलिस ठाण्यासमोर ‘होळी’ पेटविण्याचा निर्धार केला आहे.कदम म्हणाले, पोलिसांनादेखील इतरांप्रमाणे सण, समारंभात सहभागी होऊन सणाचा आनंद लुटण्याचा अधिकार आहे. सततचे बंदोबस्त व कायदा व्यवस्था सांभाळण्याच्या नादात सण, समारंभापासून त्यांना दूर राहावे लागते. याचा परिणाम म्हणून पोलिसांना मानसिक व कौटुंबिक स्वास्थ्य मिळत नाही आणि कामामध्येही उत्साह राहात नाही.
याचा सकारात्मक विचार करून यावर्षीपासून आजरा पोलिस ठाण्याच्या आवारात मान्यवरांच्या उपस्थितीत होळी पेटविली
जाणार आहे. या उत्सवात आजरा पोलिस ठाण्याचे सर्व कर्मचारी सहभागी होतील. होळीसारख्या उत्साहाने भरलेल्या सणामध्ये
पोलिस कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतल्यास कुटुंबीयांपासून दूर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना या सणाचा आनंद लुटता येईल, असेही पोलिस उपनिरीक्षक कदम यांनी सांगितले.
पहिलाच प्रयोग
आजरा पोलिस ठाण्यामध्ये इफ्तार पार्टी वगळता अन्य कोणत्याही सणांशी संबंधित कार्यक्रम होत नाहीत. यावर्षी प्रथमच आजरा पोलिस ठाण्यासमोर होळी पेटणार आहे.