दोन हजार रूपयाच्या दारूसाठी नऊ लाखांची कार पोलीसांनी केली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 03:46 PM2019-03-27T15:46:42+5:302019-03-27T15:50:00+5:30
लोकसभा निवडणुक आचारसंहितेदरम्यान मद्य वाहतूक करणारा कारचालक अटकेत
सोलापूर : लोकसभा निवडणुकीनिमित्त जाहीर करण्यात आलेल्या आचारसंहितेदरम्यान कुमठा नाका येथे नाकाबंदीदरम्यान दोन हजार रूपये किमतीची विदेशी दारू आढळून आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाºयांनी कारचालकास अटक करून नऊ लाखांची कार जप्त केली आहे. अवैध मद्य वाहतूक रोखण्यासाठी चार ठिकाणी २४ तास नाकाबंदी करण्यात आली आहे.
नाकाबंदीमध्ये कुमठा नाका येथे परागकुमार रामराज शुक्ला (रा. सोलापूर) याची कार (क्र.एमएच-१३ डीई-१३९६) अडवण्यात आली. कारमध्ये ७५0 एमएल विदेशी मद्य असलेली बाटली आढळून आली. मद्याची परवानगी आहे का अशी विचारणा केली असता नसल्याचे सांगण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाºयांनी परागकुमार शुक्ला याला ताब्यात घेऊन कार जप्त केली. विभागीय राज्य उत्पादन शुल्क विभाग पुण्याच्या वतीने देण्यात आलेल्या आदेशानुसार सध्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी, मंद्रुप (नांदणी), मंगळवेढा तालुक्यातील मरवडे आणि शहरातील काही भागात नाकाबंदी केली आहे. नाकाबंदीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक नेमण्यात आले आहे. विशेष पथकामध्ये नोडल आॅफिसर व कर्मचाºयांचा समावेश आहे.