जनावर बाजारात चोरीच्या म्हशी विक्रीसाठी आणलेल्या चौघांना पोलिसांनी पकडले
By दिपक दुपारगुडे | Published: May 26, 2024 07:04 PM2024-05-26T19:04:28+5:302024-05-26T19:05:07+5:30
जनावरांच्या बाजारातून कत्तलखान्याकडे जाणारी जनावरे, चोरी रोखण्यासाठी पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते.
सोलापूर : जनावरांच्या बाजारातून कत्तलखान्याकडे जाणारी जनावरे, चोरी रोखण्यासाठी पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिसांना काही जणांची हालचाल संशयित वाटल्याने संशयावरून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कलेढोण व घरनिकी ता.आटपाडी येथून शेतकऱ्यांच्या दोन म्हशी चोरून बाजारात विक्रीसाठी आणल्याचे लक्षात येताच पोलिसांनी चौघांना रंगेहात पकडले.
याप्रकरणी अमर चंद्रकांत जाधव, युवराज नारायण बुधावले, अक्षय अशोक बुधावले व अर्जुन माधव मंडले सर्वजण (रा. करगणी, ता. आटपाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या आदेशान्वये सांगोला पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन जगताप, पोलिस उपनिरीक्षक पोपट काशीद, पोलिस हवालदार संतोष देवकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब झोळ, असलम काझी, पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे यांनी केली.