५० हजाराची लाच स्वीकारताना पोलिसाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 08:46 PM2024-05-10T20:46:08+5:302024-05-10T20:46:27+5:30
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.
संताजी शिंदे, सोलापूर : गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजाराची लाच स्वीकारताना, पंढरपुरातील पोलिसाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.
वैजिनाथ संदीपान कुंभार (वय ५२ नेमणूक पंढरपूर शहर पोलिस ठाणे, रा. इसबावी पंढरपूर) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस नाईकाचे नाव आहे. पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात भादवि संहिता १८६० चे कलम २७९, ३३६, ३३८ व मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १३४ (ए), १३४ (बी) १७७, १८४ प्रमाणे अज्ञात वाहना विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यात मोटारसायकल न दाखवण्यासाठी तसेच तक्रारदाराला आरोपी न करण्यासाठी पोलिस नाईकाने एक लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडी अंति ५० हजार रूपये देण्याचे ठरले. या बाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी ही रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वैजिनाथ कुंभार यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, हवालदार अतुल घाडगे, सलीम मुल्ला, पोलिस नाईक स्वामीराव जाधव, शाम सुरवसे यांनी पार पाडली.