वाळू माफियांकडून पोलिसाला मारहाण, आठजणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:36 AM2021-05-05T04:36:17+5:302021-05-05T04:36:17+5:30
बार्शी : बार्शी तालुक्यातील भोईंजे येथील घोरवडा येथे बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला ...
बार्शी : बार्शी तालुक्यातील भोईंजे येथील घोरवडा येथे बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. शिवाय यापुढे वाळू कारवाईला यायचे नाही, अशी धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी तिघांना अटक करून न्यायमूर्ती ए. एस. सबनीस यांच्यासमोर उभे केले असता, त्यांचा जमीन नामंजूर केला.
या गुन्ह्यातील आठपैकी सोमनाथ मुळे, अतुल कवठे व गौतम कांबळे या तिघांना अटक करण्यात आले होते. त्यांची पोलीस कोठडी संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
ही घटना भोईंजे येथे १ मे रोजी घडली होती. याबाबत जखमी पोलीस प्रवीण शहाणे यांनी तालुका पोलिसात तक्रार देताच कृष्णा उर्फ बबल्या कल्याण जाधव, सोमनाथ सत्यवान मुळे, विजय अर्जुन निकम, चेतन भीमराव नवले, अजित अर्जुन निकम, अजित सुरवसे, भाऊ महादेव चव्हाण व अतुल धनाजी कवटे (सर्व रा. भोईंजे, ता. बार्शी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यातील तिघांना अटक केली होती.
याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत भोईंजे येथे ओढ्यात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांना मिळाल्याने त्यांनी याठिकाणी कारवाई करण्यास सांगितले. त्यामुळे फिर्यादीसह पोलीस नाईक अभिजीत घाटे, पोलीस कॉन्स्टेबल माधव धुमाळ हे दुचाकीवरून घोर ओढ्याकडे जात असताना एकजण ‘तुम्ही ओढ्याकडे जायचे नाही’, असे म्हणून पोलिसांच्या दुचाकीसमोर आडवा उभा राहिला. यावेळी फिर्यादी शहाणे यांनी त्याला बाजूला करून घोर ओढ्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी जात असल्याचे सांगताच त्याने त्याच्या साथीदारांना बोलावले व त्यावेळी पोलीसही खाली उतरताच एकाने लाकडी दांडक्याने फिर्यादी पोलीस शहाणे यांना मारहाण केली व धमकीही दिली. यावेळी पोलीस कर्मचारी गाटे व धुमाळ हे मदतीला आल्याने सर्व लोक तेथून पळून गेले. पोलिसांनी पळून जाणारा सोमनाथ सत्यवान मुळे याला पकडले. त्याच्याकडून पळून गेलेल्यांची माहिती घेऊन तिघांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करत आहेत.