सोलापुरातील संचारबंदीत पोलीस व्यस्त; गल्लीबोळांत सुरू असलेले जुगार धंदे मस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 03:48 PM2021-05-18T15:48:37+5:302021-05-18T15:48:42+5:30
लाखोंची उलाढाल : मन्ना, अंदार-बाहर, रम्मी यासारख्या पत्त्यांचा रंगतो खेळ
सोलापूर : शहरात सर्वत्र संचारबंदी आहे. रस्त्यावर गर्दी होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये व्यस्त आहेत; मात्र दुसरीकडे गल्ली बोळांमध्ये जुगार धंदे मस्त सुरू आहेत. मन्ना, अंदार-बाहर, रम्मी यासारख्या पत्त्यांच्या खेळात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संचारबंदी सुरू आहे. दि.१ एप्रिलपासून शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेल रोड पोलीस ठाणे, सदर बाजार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे, सलगर वस्ती पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे या हद्दीतील प्रमुख रस्त्यांवर व चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. एकीकडे असा बंदोबस्त लावण्यात आलेला असताना शहरातील गल्लीबोळांमध्ये राजकीय नेते, स्थानिक गुंडांच्या आशीर्वादाने बिनधास्तपणे जुगार अड्डे सुरू आहेत.
गुंडांच्या भीतीमुळे स्थानिक नागरिक कोठेही वाच्यता करीत नाहीत. काही ठिकाणी ठराविक वेळेत जुगार चालतो. जुगार अड्ड्यावर जुगार खेळणाऱ्या लोकांना चांगले संरक्षण दिले जाते. एका ठिकाणी जुगार अड्डा सुरू असतो, तर त्या मालकाचे कामगार त्याच परिसरात लांब लांबच्या अंतरावर लक्ष ठेवण्यासाठी उभे केले जातात. पोलिसांची एखादी गाडी घरी गेली की लगेच मोबाईलवरून जुगार चालणाऱ्या ठिकाणी संबंधित मालकाला फोन करून माहिती दिली जाते. संचारबंदीमध्ये बाजारपेठ बंद आहे, व्यवहार ठप्प आहे; मात्र जुगार अड्डा सध्या तेजीत असल्याचे दिसून येत आहे.
जुगार अड्ड्यांची ठिकाणे
0 गल्लीबोळांतील समाज मंदिरे, बंद असलेली घरे, महापालिकेच्या अडगळीतील जागा, प्रार्थना मंदिराच्या शेजारी, भाड्याने घेतलेल्या घरात, काही जुगार मालकांनी स्वतःच्याच घरात गच्चीवर, महापालिकेच्या शाळा, पाण्याच्या टाक्या, बंद असलेले बंगले, महापालिकेचे बंद कार्यालये, आदी ठिकाणी कोणाला समजणार नाही अशा ठिकाणी जुगार सुरू आहेत.
-पोलिसांना सगळं माहीत आहे
0 जुगार अड्डे कुठे कुठे सुरू आहे त्याची सर्व माहिती संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना असते. वरिष्ठांकडून जेव्हा जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याचे आदेश येतात तेंव्हा नावाला दोन किंवा चार पोलीस घटनास्थळी जातात. किरकोळ कारवाई दाखवितात किंवा काही नव्हते असा रिपोर्ट देतात. बऱ्याच वेळा पोलीस येण्याच्या अगोदर संबंधित जुगार अड्ड्याच्या मालकाला माहिती समजते आणि तत्काळ बंद केले जाते. पोलिसांना सर्व काही माहीत आहे अशी माहिती एका स्थानिक नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.