पोलिसांनी जप्त केला ११ पोती गांजासह ६९ लाखांचा मुद्देमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:27 AM2021-06-09T04:27:49+5:302021-06-09T04:27:49+5:30
पंढरपूरकडून पिकअपमधून गांजाची पोती महूदला येणार असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक ...
पंढरपूरकडून पिकअपमधून गांजाची पोती महूदला येणार असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना मिळाली होती. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार केली. त्यानुसार रविवारी मध्यरात्री १ च्या सुमारास महूद ते पंढरपूर रस्त्यावरील हॉटेल जय तुळजाभवानी (गायगव्हाण फाटा) येथे सापळा लावला. दरम्यान, दीडच्या सुमारास पंढरपूरकडून पांढऱ्या रंगाचा पिकअप भरधाव वेगाने येत असल्याचे पाहून पोलिसांनी चालकास थांबण्याचा इशारा केला.
पिकअप थांबताच पोलिसांनी चालकास पिकअपमध्ये काय आहे, असे विचारले असता त्याने मोकळे कॅरेट असल्याचे सांगितले. पोलिसांनी पिकअपची झडती घेतली असता हौद्यात वरच्या बाजूला मोकळे कॅरेट ठेवून पिवळ्या रंगाच्या ताडपत्रीखाली ११ पोती गांजा ठेवल्याचे दिसून आले. पोलिसांनी पंचासमक्ष ११ पोत्यातील ३१८ किलो ९५ ग्रॅम वजनाचा सुमारे ६३ लाख ६१ हजार ९०० रुपये किमतीचा गांजा, पिवळ्या रंगाच्या ताडपत्रीसह एमएच १२, जेएफ १४४४ पिकअप असा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी फिर्याद दाखल केली आहे. तपास पोलीस निरीक्षक सुहास जगताप करीत आहेत.
ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे, सहाय्यक फौजदार कल्याण ढवणे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले, पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूराव झोळ, पोलीस हेड काॅन्स्टेबल आप्पासाहेब पवार, पोलीस नाईक अभिजीत मोहोळकर, पोलीस नाईक सुनील मोरे, पोलीस नाईक क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटील, पोलीस काॅन्स्टेबल जमीर मुजावर, पोलीस काॅन्स्टेबल धुळा चोरमले, पोलीस काॅन्स्टेबल सुमित पिसे, चालक पोलीस काॅन्स्टेबल नदाफ, पोलीस काॅन्स्टेबल लोंढे, होमगार्ड गणेश झाडबुके यांनी केली.