'खाकी' ला मलीन करणाऱ्या पोलीसांना बडतर्फीचे वेसण घालणार : तेजस्वी सातपुते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 07:41 AM2020-10-29T07:41:19+5:302020-10-29T07:42:14+5:30
पोलीस दलाची प्रतिमा जपा; मंगळवेढा पोलीस ठाण्यास भेट
मंगळवेढा : पोलिसांनी आपले सेवाव्रत निष्ठेने जोपासताना मोठ्या कष्टाने कमविलेल्या वर्दीवर कुठलाही कलंक लागणार नाही, याची सर्वोतोपरी खबरदारी घ्यावी. मी अधिकारी म्हणून नेहमी पोलीस दलाच्या पाठीशी आहे, मात्र खाकी वर्दीची प्रतिमा मलीन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फीचे वेसण घालू असा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिला.
एसपी तेजस्वी सातपुते यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलीस ठाण्यातील कामकाजाची पाहणी करून पोलिसांशी संवाद साधला. पुढे त्या म्हणाल्या की, पोलीस ठाण्यात येणा-या प्रत्येक नागरिकांची तुम्ही दखल घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या तक्रारीची नोंद घेतली पाहिजे. त्याच्याशी सौजन्याची वागणूक दिली पाहिजे. पोलिस विभाग शिस्तप्रिय आहे. कोणीही कर्मचारी, अधिकारी नियम पायदळी तुडविताना आढळल्यास त्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. प्रत्येक कर्मचारी, अधिकाऱ्याने पोलीस दलाची प्रतिमा जपावी.
समाजात वावरताना तुमची वर्तणूक चांगली ठेवली पाहिजे अन्यथा तुमच्या गैरवर्तणुकीमुळे पोलिसांची प्रतिमा खराब होते. अवैध व्यावसायकाशी तुमचा कसलाही कॉन्टॅक्ट असता कामा नये तसे आढळून आल्यास मी बडतर्फीची कारवाई करेन असा इशारा पोलिसांशी संवाद साधताना दिला.
पोलिसांच्या निवासाच्या प्रश्नी पाठपुरावा करू, महिला सक्षमीकरणसाठी कार्यरत राहू, शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या. कर्नाटक सीमेवरील गुटखा तस्करी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करू असे सांगितले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, सहायक पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते.
सातारा जिल्हयापेक्षा सोलापूर जिल्हा वेगळा असून येथील सर्व पोलिस ठाण्यामधील अधिकार्यांशी चर्चा करून संपूर्ण माहिती घेवून जिल्हयात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिल या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जातील. प्रामुख्याने महिला सक्षमीकरणावर भर देवून महिलांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या जातील
कर्नाटक राज्यातून सातत्याने येणारा अवैध गुटखा रोखण्यासाठी पोलिसांना अधून मधून अचानक नाकाबंदी लावून सीमेवर वाहनांची करण्याच्या सूचना केल्या.
मंगळवेढा सबजेल हे ब्रिटीशकालीन असल्यामुळे त्याची पडझड होत आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली जाईल. देशातील महिलांबाबत वाढणार्या घटना पाहता महिलांची सुरक्षितता अतिशय महत्वाची आहे.यासाठी महिला सक्षमीकरण होणेकामी प्रयत्न केले जातील. मंगळवेढा शहरातून होणारी अवजड वाहतूक तात्काळ थांबविण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या. शहरालगत बायपाय रोड असतानाही अवजड वाहने शहरामधून प्रवेश करीत असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यापुर्वी अपघात होवून चौघांचा बळी गेल्याचे निदर्शनास पत्रकारांनी आणून दिल्यानंतर सुरक्षितता कमान उभी करून बायपास रस्त्याने वाहने वळविण्याच्या सूचना करण्यात आल्या. पोलिस कर्मचार्यांना केवळ २० निवासस्थाने असल्याने राहण्याची अवस्था मंगळवेढयात बिकट आहे. कर्मचार्यांना घरभाडे भत्ता मिळतो,परिणामी कर्मचार्याने भाडयाच्या घरात रहावे ज्यांना घरभाडे मिळत नाही त्यांचे घरभाडे मिळवून देवू असे आश्वासन यावेळी सातपुते यांनी दिले. पोलिस कर्मचार्यांनी कुठल्याही कामात कुचराई न करता चांगले काम करावे. अन्यथा कामात कुचराई करणार्यांना तांदळातील खडयासारखे वेचून बाजूला काढून योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा सातपुते यांनी दिला.
पोलिस नागरिकांसाठी खांदयाला खांदा देवून काम करीत आहेत. मात्र जनतेनेही पोलिसांना सहकार्य करावे, चोर्या रोखण्यासाठी गावपातळीवर सी.सी.टि.व्ही. कॅमेरे लावावेत, गावात अंधार राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पोलिस पाटील यांनी गावात चोर्या होणार नाहीत यासाठी सतर्क रहावे, बाहेरगावी जात असताना प्रत्येकाने शेजार्यावर घराकडे लक्ष देण्याची जबाबदारी टाकावी. तसेच घराला छोटे कुलूप लावण्याऐवजी चांगल्या प्रतीचे कुलूप लावल्यास चोर्या रोखल्या जातील असेही त्या म्हणाल्या.