बापाने आत्महत्या केल्याचा मुलांनी केलेला बनाव पोलिसांकडून उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:22 AM2021-04-16T04:22:14+5:302021-04-16T04:22:14+5:30
करमाळा : बापाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करून मुलं गावातील लोकासमोर जोरजोरात रडली. बापाचा अंत्यसंकार ...
करमाळा : बापाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करून मुलं गावातील लोकासमोर जोरजोरात रडली. बापाचा अंत्यसंकार ही उरकला... मात्र पोलिसांना आलेल्या एका निनावी फोनने बनवेगिरीचे सारे बिंग फोडले.
हा प्रकार आहे करमाळा तालुक्यातील वरकुटे (मूर्तीचे) येथील. आईला सतत त्रास देऊन घरात भांडण करणाऱ्या बापाचा दोन सख्ख्या भावांनी गळफास देऊन खून केल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. ७ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता हा प्रकार घडला.
या प्रकरणी पोलिस नाईक श्रीकांत शहाजी हराळे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार १३ एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजता करमाळा पोलिस स्टेशनला एक निनावी फोन आला. वरकुटे येथे आत्महत्या नसून मुलांनीच वडिलाचा खून केल्याची माहिती त्या व्यक्तीने दिली.
यानंतर पोलिस उपनिरीक्षक तानाजी पवार यांनी वरकुटे येथे धाव घेतली. तेथे चौकशी केली असता भैरू भागवत जगताप (वय ५५, रा. वरकुटे) यांचा मृत्यू झाला असून ८ एप्रिलला पहाटे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पुढे आली. भैरू यांचा मोठा मुलगा निखिल याला चौकशीसाठी बोलावले. चौकशीदरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. १६ फेब्रुवारी रोजी विवाह झाला. या लग्नाला मामाला बोलवायचे नाही, अशी धमकी दिली होती. परंतु भाऊ अक्षय याने मामाला बोलावले होते. त्याचा राग वडिलांच्या मनात होता.
७ एप्रिलला रात्री साडेदहा वाजता सारे झोपी गेले असताना मुलांना आईच्या ओरडण्याचा आवाज आला. तुझा भाऊ मुलाच्या लग्नाला कसा आला असा जाब विचारीत मारहाण केली. मुलांनी सोडवायचा प्रयत्न केला असता, त्या दोघांना ते आवरत नव्हते. त्यानंतर आई वीणा व पत्नी प्रियंका या शेजाऱ्यांना बोलविण्यासाठी गेल्या. दरम्यान संशयित आरोपी निखिल व अक्षय या दोघांनी वडील भैरु यास पकडून त्याचे दोरीने पाय बांधले. तसेच गळ्याभोवती दोरीचा फास गुंडाळून तो आवळला.
---
फरफटत नेत झाडाला लटकवले
पोलिसांच्या माहितीनुसार भैरु यांना गळफास दिल्यानंतर त्यास फरफटत घराबाजूला झाडाजवळ आणले. पुन्हा त्याच्या गळ्या भोवती दोरीने फास आवळून त्याचा खून केला. त्यानंतर त्यास झाडाला लटकवून गळफास घेतल्याचा बनाव केला. परिसरातील लोक गोळा होताच दोन्ही मुले जोर-जोरात रडल्याचे पोलिसांनी सांगितले.