सोलापुरात पोलिसांकडून चोरट्यांवर फायरिंग; सुमारे दीड लाखांचा ऐवज चोरून नेला
By विलास जळकोटकर | Published: October 14, 2023 11:59 AM2023-10-14T11:59:15+5:302023-10-14T12:01:29+5:30
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोंड्याल शाळेजवळ चोरट्यांवर शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांकडून फायरिंग करण्यात आली.
विलास जळकोटकर
सोलापूर : एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोंड्याल शाळेजवळ चोरट्यांवर शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांकडून फायरिंग करण्यात आली. एमआयडीसीतील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी रोडवरील सराफाचे दुकान नुकतेच फोडण्यात आले. चोरट्याने सुमारे दीड लाखांचा ऐवज चोरून नेला होता. यानंतर सतर्क झालेल्या एमआयडीसी पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता.
दरम्यान शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कोंड्याल शाळेजवळ सहा ते दहा जणांचा चोरटे आल्याची खबर एमआयडीसी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ बंदुकीसह घटनास्थळ गाठले. त्यावेळी वाहनातून चोरीच्या उद्देशाने जाणारे चोरट्यांची गाडी दिसली. त्यांना थांबण्याचा पोलिसांकडून इशारा देण्यात आला. परंतु पकडले जाऊ या भीतीने चोरटे गाडीतून तसेच जात होते. त्यांना दोन वेळा इशारा करूनही ते थांबले नसल्याने पोलिसांनी त्यांच्या वाहनाच्या चाकांवर गोळीबार केला.
यामध्ये गाडीचे चाक बस्ट होऊन गाडी जागेवरच थांबली. त्यानंतर चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत तेथून पलायन केले दरम्यान शहरात नाकाबंदी करण्यात आली असून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.