चौकात बसणाऱ्या निरुद्योगी लोकांवर पोलिसांची रविवारपासून करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:22 AM2021-05-23T04:22:29+5:302021-05-23T04:22:29+5:30
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी केटरिंग कॉलेज येथे संयुक्त बैठक घेण्यात आली. ...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी केटरिंग कॉलेज येथे संयुक्त बैठक घेण्यात आली. तहसीलदार अमोल कुंभार, मंद्रूपच्या अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे, बीडीओ राहुल देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डी. व्ही. गायकवाड, मंद्रूपचे सपोनि नितीन थेटे, वळसंगचे सपोनि अतुल भोसले, तालुका कृषी अधिकारी पी. के. वाघमोडे यांच्यासह तालुक्यातील मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी या संयुक्त बैठकीस उपस्थित होते.
----
कडक अंमलबजावणी करा
ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वाढत असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करावे लागणार आहेत. यात कोणीही हयगय करणार नाही. दिलेल्या जबाबदाऱ्या नीटपणे पार पाडून नियमांची कडक अंमलबजावणी करा. केवळ पोलिसावर जबाबदारी ढकलून चालणार नाही, याकामी ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी दिवसभर सतर्क राहतील. वेळोवेळी पोलिसांना माहिती देतील, अशा सूचना प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी बैठकीत दिल्या.
----------
सर्वेक्षण, चाचण्या वाढवणार शहराभोवतालच्या गावासह संपूर्ण तालुक्यात सर्वेक्षण, कोरोनाच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. गावोगावी यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तपासणीनंतर रुग्णांना विलगीकरण, योग्य उपचार यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ग्रामस्तरीय समित्यांची मदत घ्यावी लागणार आहे. येत्या आठ दिवसांत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत, असेही दीपक शिंदे यांनी बैठकीत सांगितले.
-------
पोलिसांना वाहने उपलब्ध
ग्रामीण भागात प्रत्येक गावातून नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. प्रत्येक बिटसाठी स्वतंत्र वाहने जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहेत. दिवसभर पेट्रोलिंग करण्याचे नियोजन असून, नियमांचा भंग करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती बैठकीनंतर बोलताना वळसंगचे सपोनि अतुल भोसले आणि मंद्रूपचे सपोनि नितीन थेटे यांनी दिली.
----