पोलीस निरीक्षकाने दाबला फौजदाराचा गळा; सोलापुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:37 AM2018-10-31T11:37:22+5:302018-10-31T11:38:59+5:30
पोलीस दलाच्या बिनतारी संदेश यंत्रणा कार्यालयात घडला प्रकार
सोलापूर: सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागात कार्यरत पोलीस निरीक्षक सुनील बोंदर यांनी त्यांचे सहकारी माधव राखेलकर यांचा कार्यालयात गळा दाबून जिवे मारण्याची धमकी दिल्याची एमएलसी नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. २६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. दरम्यान, या प्रकरणाबद्दल सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनी दुजोरा दिला आहे, मात्र राखेलकर यांनी अद्याप आपली मानसिक स्थिती ठीक नसल्याचे कारण पुढे सरकावत वरिष्ठांशी चर्चा करून तक्रार देणार असल्याचे स्पष्ट केले.
ग्रामीण पोलीस दलामध्ये बिनतारी संदेश विभागात सुनील बोंदर हे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे सहकारी म्हणून फौजदार माधव राखेलकर कार्यरत आहेत. २६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान राखेलकर कार्यालयात कामकाजात व्यस्त असताना पोलीस निरीक्षक सुनील बोंदर त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी गालावरून हाताने चापट मारून माझा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. संबंधित प्रकार आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कानावर घातली आहे.
यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वत: उपचारासाठी दाखल झालो. येथील पोलीस चौकीत एमएलसी नोंद केली असल्याचे राखेलकरांनी स्पष्ट केले. या संदर्भात सदर बझारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी आपण राखेलकरांना पोलीस ठाण्याला बोलावले होते. त्यांनी आपली मानसिक स्थिती ठीक नाही, वरिष्ठांशी बोलून पुन्हा जबाब देण्याचे सांगितल्याचे स्पष्ट केले.