सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या मदतीला लोहमार्ग अन् लातूर, सोलापूर प्रशिक्षण केंद्रातील पोलीस
By appasaheb.patil | Published: April 28, 2021 12:19 PM2021-04-28T12:19:43+5:302021-04-28T12:23:56+5:30
कडक संचारबंदी;‘ग्रामीण’मधील वर्दळ रोखण्यासाठी पोलिसांची कुमक वाढविली
सोलापूर : जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी, मोहोळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या रुग्णवाढीला आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक गावात, गावातील प्रत्येक चौकावर पोलिसांनी चांगले लक्ष ठेवले आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. बंदोबस्ताकामी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या मदतीला पुणे लाेहमार्ग, लातूर व सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी बंदोबस्तकामी रस्त्यावर उतरली आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने कडक संचारबंदीचा निर्णय घेतला. अत्यावश्यक सेवावगळता सर्वकाही बंद करण्यात आले आहे. किराणा व अन्य जीवनाश्यक वस्तूंना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. या संचारबंदीकाळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येत आहे. ग्रामीण पोलिसांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली २८ ठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे, शिवाय लहान व मोठे असे १७३ रस्ते बंद केले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्रामीण पोलिसांकडून विविध निर्बंध लादण्यात येत आहेत. शिवाय विविध तालुक्यातील हॉटस्पॉट गावांना पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक स्वत- भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी करून आढावा घेत आहेत.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, कारण नसताना एका गावातून दुसऱ्या गावाला जाऊ नये, अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्क, फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे. स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करावे.
- अतुल झेंडे, अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
पोलीसपाटील, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक ठेवणार गावावर लक्ष
ग्रामीण भागातील कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी व विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामीण पोलीस व्हिलेज टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. यात संबंधित पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार, ग्रामसेवक, पोलीसपाटील, तलाठी, सरपंच, होमगार्ड यांचे संयुक्त पथक तयार करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.
असा आहे पोलिसांचा बंदोबस्त...
- साेलापूर ग्रामीण पोलीस - २५००
- होमगार्ड - ९५०
- पुणे लाेहमार्ग पोलिस - २५
- लातूर पोलिस प्रशिक्षण केंद्र - २५
- सोलापूर प्रशिक्षण केंद्र - २५
- इतर - २००