सोलापुरातील या नगरसेवकाच्या घरावर पोलिसांचा छापा; काय सापडले वाचा बातमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 01:14 PM2020-08-28T13:14:39+5:302020-08-28T13:14:58+5:30
नगरसेवक सुनील कामाठीच्या घरात सापडली २०० मटका बुकींची नावे
सोलापूर : मटक्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या नगरसेवक सुनील कामाठीच्या घराची गुरुवारी झडती घेण्यात आली. यावेळी कागदपत्रे व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. कागदपत्रांवरून जेलरोड व एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील २०० बुकींची नावे निष्पन्न झाली आहेत.
न्यू पाच्छापेठ कोंचीकोरवी गल्ली येथे राजभूलक्ष्मी इमारतीमध्ये २४ आॅगस्ट रोजी सुरू असलेल्या मटका बुकींच्या केंद्रावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली होती. धाडीत पोलीस शिपायासह २२ जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक सुनील कामाठी, पोलीस शिपाई स्टीफन स्वामी यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी २२ जणांना अटक करण्यात आली होती. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी आणखी सहा ते सात जणांना अटक करण्यात आली आहे.
गुरुवारी नगरसेवक सुनील कामाठी यांच्या घरी पंचनामा करण्यासाठी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे व त्यांच्या पथकातील पोलीस गेले होते. दरम्यान, त्यांच्या घरातून मटक्यासंदर्भातील विविध कागदपत्रे व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून जेलरोड व एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १७ लाईन असल्याचे समजले आहे. सतरा लाईनमध्ये एकूण दोनशे एजंट व त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. निष्पन्न झालेल्या नावावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संबंधित एजंटाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यातील सात ते आठ जणांना अटक करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सुनील कामाठी व इस्माईल मुच्छालेचा शोध सुरू
मटक्यातील प्रमुख आरोपी नगरसेवक सुनील कामाठी व इस्माईल मुच्छाले हे दोघे सध्या फरार झाले आहेत. दोघांचे मोबाईल बंद आहेत. गुन्हा दाखल झालेले अन्य आरोपीही सध्या फरार आहेत. कोणत्या एजंटाचा कुठे व्यवसाय सुरू होता. कशा पद्धतीने मटका चालविला जात होता, याची सखोल चौकशी सध्या गुन्हे शाखेच्या पोलिसांमार्फत सुरू आहे.
गुन्हे दाखल झालेल्यांची माहिती द्या : अभय डोंगरे
गुन्हे दाखल झालेले मटक्यातील आरोपी हे सध्या फरार आहेत. यामुळे नगरसेवक सुनील कामाठी इस्माईल मुच्छाले व अन्य लोकांचा समावेश आहे. यातील कोणाचीही माहिती समजल्यास नागरिकांनी माझ्या मोबाईल क्रमांक - ७५०७१३३१०० वर किंवा पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचा मोबाईल क्रमांक- ९९२३१७५१०० वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले आहे.