काटेरी झुडपं सारत पोलिसांनी धाड टाकून; हातभट्टीचं ६७ बॅरेल रसायन केलं नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 04:27 PM2021-08-04T16:27:45+5:302021-08-04T16:27:51+5:30
सेवालालनगरातील कारवाई -सोलापूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई
सोलापूर : सकाळचे सहा वाजलेले... पोलिसांची गाडी गावच्या वेशीवर थांबलेली... गाडीतून साध्या वेशातील पोलीस अधिकारी उतरले... बंधाऱ्यावर असलेल्या झाडाझुडपातून मार्ग काढत दीड किलोमीटरचे अंतर पार केले... साध्या वेशातील पोलिसांना पाहून अवैध धंदेवाल्यांची धांदल उडाली... बघता बघता चोरून खड्ड्यात व झुडपात लपविलेले ६७ प्लास्टिक व लोखंडी बॅरलमधील २ लाख ८५ हजार ६०० रुपयांचे गूळमिश्रित रसायन नष्ट करून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी मोहीम फत्ते केली.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशानुसार सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील नान्नज दूरक्षेत्र भाग १ मधील सेवालालनगर तांडा (ता. उ. सोलापूर) येथे अवैद्य धंद्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास सोलापुरातून सेवालालनगरकडे मार्गस्थ झाले. सहाच्या सुमारास सेवालालनगर येथे पोहोचले. गावाच्या वेशीवर असलेल्या मंदिरासमोर उभी करून पोलीस बंधाऱ्याजवळील झाडाझुडपातून मार्ग काढीत अवैध दारू तयार करण्यात येणाऱ्या घटनास्थळावर पोहोचले. सुरुवातीला पोलिसांच्या कारवाईला अवैध धंदेवाल्यांनी विराेध केला. महिलांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी कशाचीही तमा न बाळगता कारवाई करून मोहीम फत्ते केली.
-------------
बाथरूममध्ये ठेवली होती दारू
पोलिसांचे पथक घेऊन पोलीस निरीक्षक अरुण फुगे येथे घटनास्थळी पोहोचले. तेव्हा फुगे यांना बाथरूममध्ये काही तरी असल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ महिला पोलिसांना बाथरूम परिसराची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले. तपासणीत बाथरूममध्ये तयार केलेली दारू ठेवण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी तेही जप्त करून कारवाई केली.
------------
गूळ पावडर अन् नायलॉनचे पांढरे पोते जप्त
दारू तयार करण्यासाठी लागणारे गूळमिश्रित रसायन तयार करण्यासाठी लागणारे गूळ पावडर, ७ नायलॉनचे पांढरे पोते प्रत्येकी ३० किलो वजनाचे असा एकूण ४ हजार २०० रुपयांचे साहित्यही पोलिसांनी जप्त केले.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिलेल्या आदेशानुसार सोलापूर तालुका पोलिसांच्या टीमने सेवालालनगर तांडा येथील अवैध धंद्यावर धाड टाकून कारवाई केली. पूर्वी अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना संयुक्त कारवाई केली जात होती. मात्र, सेवालालनगर येथील कारवाई फक्त सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे. यापुढेही अशीच अवैध धंद्याविरोधात कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे.
- अरुण फुगे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पाेलीस ठाणे.