तांडोर-तामदर्डी येथील अवैध वाळु उपसा करणाºयांवर पोलीसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 10:47 AM2018-03-12T10:47:37+5:302018-03-12T10:47:37+5:30
३ कोटींच्या मुद्देमालासह १७ जण ताब्यात, २९ जणांवर गुन्हा दाखल, सोलापूर ग्रामीण पोलीसांची कारवाई
मंगळवेढा : तांडोर (ता. मंगळवेढा) येथील भीमा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करणाºया ठिकाणांवर जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या विशेष पथकाने रविवारी पहाटे छापे टाकून २० ट्रॅक्टर, ७ ट्रक, ३ जेसीबी, १० मोटरसायकली, एक बोलेरो जीप यासह ११५ ब्रास वाळूसह ३ कोटी रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून २९ वाहनचालकांविरूद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवेढा पोलिसांत सुरू होती. दरम्यान, मंगळवेढा येथे ही वाळूची दुसरी जम्बो कारवाई आहे.
मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथील भीमा नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. सांगली, कोल्हापूर, सातारा या ठिकाणची वाहने या वाळू उपशामध्ये गुंतली होती. या वाळू उपशाची माहिती जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांना मिळताच त्यांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, सपोनि संदीप धांडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश मोरे, पोलीस नाईक अमृत खेडकर, पोलीस शिपाई पांडुरंग केंद्रे, श्रीकांत बुरजे, अक्षय दळवी, बाळराजे घाडगे, गणेश शिंदे, सचिन कांबळे, सुरेश लामजाने, अभिजित ठाणेकर, अनुप दळवी, अमोल जाधव, विष्णू बडे, बालाजी नागरगोजे, महादेव लोंढे आदी कर्मचाºयांना रविवारी पहाटे तांडोर येथे छापा टाकण्यासाठी पाचारण केले.
यावेळी पहाटे ५ वाजता भीमा नदीच्या पात्रात २० ट्रॅक्टर, ७ ट्रक , ३ जेसीबीच्या सहाय्याने वाळू भरत असल्याचे घटनास्थळी पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी छापा टाकताच वाळूतस्कर सैरावैरा वाहने जागेवर सोडून नदीच्या पात्रात पळू लागले. फिल्मी स्टाईलने पाठलाग करून वाळूतस्करांना पकडण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांनी चोहोबाजूंनी गराडा घालून वाहनचालक जयाप्पा सहदेव गायकवाड, हमीद नबीसाब इनामदार, गणेश ज्ञानेश्वर पुजारी, परशुराम रंगनाथ पुजारी, किरण सुरेश नागणे, बिरूदेव विलास मासाळ, वैभव विलास पाटील, बालाजी दगडू मळगे, अर्जुन गोपाळराव जाधव, ओंकार शिवानंद व्हडगे, सागर मारूती बिले, सुरेश उत्तम पवार, विशाल जगन्नाथ पवार, महादेव पंडित अधटराव, उमेश विठ्ठल भार्इंकट्टी, गणेश चंद्रकांत लोखंडे, दामोदर बाळू शिंदे आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर रवींद्र उर्फ पपुल्या रामा काळे, उमेश घाडगे, ऋतुराज ताड, सुरेश उर्फ बिबल्या रामा काळे, सचिन काळे, किशोर रामा काळे, विक्या भीमसिंग भोसले, शंकु सुरेश काळे, संजय शरणप्पा भोसले, सूरज शरणप्पा भोसले, अमित शरणप्पा भोसले, शरद पवार हे १२ जण फरार झाले आहेत.
दिल्लीच्या हरित लवादाने जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा करण्यावर बंदी घातली असताना येथे मात्र यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा केला जात आहे, हे आजच्या घटनेवरून उघड झाले आहे. दरम्यान वाळू कारवाईप्रसंगी सोलापूरहून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त मागवण्यात आला होता.
मंगळवेढ्यातील वाळूवरील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची ही दुसरी कारवाई आहे. यामध्ये वाळू तस्करांची एक बोलेरो जीप, दहा मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
असा प्रकार घडलाच नाही
वाळू कारवाईप्रसंगी गोळीबार झाला असून, त्यामध्ये एक मयत झाल्याचे वृत्त दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी असा प्रकार घडला नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगून मलाही मुंबईवरून चॅनलवाल्याचे फोन आल्याचे ते म्हणाले.