बार्शीतील पोलीस निवासस्थानांची दुरवस्था; शौचालय ड्रेनेजचे पाईप फुटल्याने सर्वत्र दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:25 PM2018-12-19T12:25:52+5:302018-12-19T12:29:15+5:30
रंग गेलेल्या भिंती, छोट्या खोल्या : ड्रेनेजचे पाईप फुटल्यामुळे घाणीच्या साम्राज्याची दुर्गंधी
बार्शी : बार्शीतील पोलीस निवासस्थानांची दुरवस्था झाली असून, अनेक खोल्यांचे छत गळत आहे. कित्येकांचे धपले पडत आहेत, अनेक रूमच्या फरशा फुटल्या असून, गळक्या असलेल्या ड्रेनेजमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरल्यामुळे रोगराई होण्याची भीती निर्माण झाली आहे़ याठिकाणी राहणारे पोलीस व त्यांच्या कुटुंबांना जीव धोक्यात घालूनच राहावे लागत आहे.
बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांच्या कुटुंबांना राहण्यासाठी बार्शी शहरात तीन पोलीस वसाहती आहेत़
यातील दोन उपळाई रोडवर आहेत, तर काही वर्षांपूर्वी बसस्थानक रोडवर नवीन पोलीस वसाहत बांधण्यात आली आहे़ या वसाहतीमध्ये साधारणत: एक खोली आणि किचन असे स्वरूप असलेले ५२ ब्लॉक आहेत़ त्याठिकाणी ५२ कुटुंबे राहत आहेत.
या वसाहतीची मोठी दुरवस्था झाली असून, वारंवार निवासस्थानातील प्लास्टर कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच शौचालय ड्रेनेजचे पाईप फुटल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या निवासस्थानात अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने व येथे राहणाºया पोलीस कुटुंबीयांस वारेमाप खोलीभाडे असल्याने पोलिसांना इथे राहणे म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ ठरत आहे.
या वसाहतीमधील ब्लॉकही लहान असून, एक रूम आणि किचन म्हणजे वन आरके असे स्वरूप आहे़ गळके छप्पर, वाढलेले गवत, उंदीर-घुशींचा त्रास, स्वच्छतागृहाचे तुटलेले दरवाजे, फुटलेले पाईप यामुळे पसरलेली दुर्गधी, असा त्रास याठिकाणी राहणाºयांना सहन करावा लागत आहे़
अधिकाºयांकडून साधी पाहणीदेखील नाही...
- इतकी गंभीर परिस्थिती असतानाही सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी साधी पाहणी करण्याकरिताही येत नसल्याची खंत येथील कर्मचाºयांच्या कुटुंबांकडून व्यक्त करण्यात आली. यामुळे येथे राहण्यासाठी पोलीस कर्मचारी उदासीन आहेत. समोर असलेल्या मोकळ्या मैदानात जप्त करून आणलेली काही वाहने व ट्रक उभा असल्यामुळे मुलांना खेळण्यासही अडचण होत आहे़ देखभाल व दुरुस्तीवर वर्षभरात काहीच खर्च झाला नसल्याचे सांगण्यात आले. या मागणीची तातडीने दखल घेऊन देखभाल दुरुस्ती, रंगरंगोटी व स्वच्छता करावी, अशी मागणी पोलिसांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
पोलीस निरीक्षकांच्या सूचनेवरून आम्ही सदर वसाहतीची पाहणी करून दुरुस्तीसाठी किती पैसे लागतात, याचा प्रोगॅ्रम तयार करून जिल्हा पोलीस प्रमुखांकडे पाठवून दिला आहे़ त्यांच्याकडून मंजुरी आल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल़
- सुनीता पाटील
उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, बार्शी़
या विषयात लक्ष घालून वसाहतीमध्ये करावयाच्या दुरुस्ती व इतर कामांच्या खर्चाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार करून आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे़ त्याला मंजुरी मिळताच बांधकाम विभागाकडून दुरुस्ती करून घेतली जाईल़
- सर्जेराव पाटील
पोलीस निरीक्षक बार्शी शहर