सोलापूर जिल्ह्यातील पोलिसांना मिळणार रोटेशन पद्धतीने ड्युटी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 08:55 AM2020-03-26T08:55:55+5:302020-03-26T08:59:41+5:30
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नऊशे जणांवर कारवाई
पंढरपूर : पोलीस रस्त्यावर उतरून काम करत असल्याने त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. यामुळे पोलीस महासंचालक सुबोध जयसवाल यांनी ५० टक्के पोलीस काम करतील असे आदेश दिले होते. परंतु सोलापूर जिल्हा मध्ये कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सर्व पोलिस व अधिकारी काम करत आहेत. परंतु आता योग्य पद्धतीचे नियोजन लागल्याने त्यांना एक दिवस आड ड्युटी लावण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील बोलत होते. यावेळी पंढरपूर उपविभागीय पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे पो. नि. अरुण पवार, पो.नि. किरण अवचर उपस्थित होते.
त्यावेळी सर्व सरकारी खासगी आस्थापनांच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना ५० टक्के हजेरी ठेवून उर्वरीतांना सुट्टी देण्याचे आदेश दिलेत. विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने पोलिसांची हजरी ५० टक्के लावावी. असे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. परंतु सर्व पोलीस काम करत आहेत याबाबत पत्रकारांनी विचारणा केली.
त्यावर मनोज पाटील म्हणाले, सोलापूर जिल्ह्यामध्ये ९०० पोलीस कर्मचारी व १५० अधिकारी काम करत आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये संचारबंदी बाबत योग्य नियोजन झाले आहे. जिल्ह्यामध्ये ९०० कारवाई करण्यात आले आहेत. यामध्ये २०० विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आम्ही यापुढे होमगार्डही मदतीला घेणार आहोत. कोरोना विषाणू संसर्ग जन्य रोगांपासून पोलिसांचा बचाव व्हावा. यासाठी यापुढे रोटेशन पद्धतीने पोलीस यंत्रणा कामाला करणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
मास्क व सॅनिटायझर खरेदीसाठी निधी
मास्क व सॅनिटायझर खरेदीसाठी प्रत्येक पोलिस ठाण्याला निधी देण्यात आला आहे. प्रत्येक पोलिसाला मास्क व सॅनिटायझरची बाटली खिशामध्ये ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण पोलिसांच्या आरोग्य व्यवस्थित असेल तरच नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित असणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.