माघी यात्रेनिमित्त पोलीस यंत्रणा सज्ज; पंढरपुरात असणार दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त
By Appasaheb.patil | Published: February 19, 2024 12:58 PM2024-02-19T12:58:29+5:302024-02-19T12:58:47+5:30
पंढरपुरात दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी दिली.
पंढरपूर :- माघी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. २० फेब्रुवारी २०२४ जया एकदशी असून, माघी यात्रा कालावधी २६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे. या कालावधीत पंढरपूरात येणाऱ्या भाविकांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून पंढरपुरात दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी दिली.
वारी कालावधीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी १ हजार ३९४ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये १ उपविभागीय पोलीस अधिकारी, १० पोलीस निरिक्षिक, ५५ सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, १० महिला सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक ६१८ पोलीस कर्मचारी व ७०० होमगार्ड तसेच एक जलद प्रतिसाद पथक, एक आरसीएफ तुकडी व दोन बीडीडीएस पथके नियुक्त करण्यात आले आहेत. वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र, ६५ एकर, महाव्दार चौक, महाव्दार घाट, पत्राशेड व नामदेव पायरी या सहा ठिकाणी वॉच टॉवर करण्यात आले आहेत. तसेच नदीपात्रासह, प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर, स्टेशन रोड आदी ठिकाणी १६२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याचेही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.