मोकाट फिरणाऱ्यांवर पोलीस करणार कडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:23 AM2021-05-26T04:23:12+5:302021-05-26T04:23:12+5:30
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुर्डूवाडी पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनी कुर्डूवाडी शहराबाहेरील ग्रामीण भागातील आपत्कालीन ...
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुर्डूवाडी पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनी कुर्डूवाडी शहराबाहेरील ग्रामीण भागातील आपत्कालीन व्यवस्थेविषयी व समस्यांबाबतच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. ग्रामीण भागातील नागरिक मोकाटपणे कुर्डूवाडी शहरात येतात. त्यांना येथून पुढे कामाशिवाय येऊ देऊ नये. मोकाट फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी केल्या.
याबरोबरच टेंभुर्णी, मोडनिंब व माढा येथील पोलिसांच्या पथकाने आरोग्य विभागाच्या पथकासमवेत थांबून मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना तपासणी करून त्यांच्यावर कारवाई केली. या वेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलीस निरीक्षक गोरख गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे आदी उपस्थित होते.
----
एसपींच्या दौऱ्याने चोरीचुपके धंंदे बंद
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा कुर्डूवाडी पोलीस ठाण्याकडे दौरा आहे म्हटल्यावर या पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कुर्डूवाडी शहरासह सर्व गावांतील चोरून चालणारे अवैध व इतर व्यवसाय हे कडेकोटपणे बंद असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर प्रत्येक रस्त्यावर पोलीस उभे होते. एसपी दुपारी येऊन गेल्यानंतर पुन्हा हे चोरीचुपके व्यवसाय सुरू झाल्याचे दिसून आले. पोलीस अधीक्षकांनी दररोजच आपल्या शहराकडे यावे म्हणजे सर्वांनाच शिस्त लागेल, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
---------