रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पकडण्यासाठी सोलापूर शहरात पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:53 AM2019-03-09T11:53:53+5:302019-03-09T11:55:34+5:30
सोलापूर : शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गेल्या दोन दिवसात कोम्बिंग आॅपरेशन करण्यात आले. सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...
सोलापूर : शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गेल्या दोन दिवसात कोम्बिंग आॅपरेशन करण्यात आले. सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत १०० ते १२५ गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली.
शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी या उद्देशाने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हे शाखा व पोलीस स्टेशनच्या वतीने कोम्बिंग आॅपरेशन करण्यात आले. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली २० ते २५ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. हद्दीतील तडीपार आरोपी आढळून आले नाहीत.
दोन वॉरंटमधील आरोपी घरी आढळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत एकूण १५ आरोपींची तपासणी करण्यात आली, त्यातील ७ आरोपी घरी मिळून आले. पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग आॅपरेशन करण्यात आले. दरम्यान, २५ ते ३० आरोपींची तपासणी करण्यात आली. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताकीद देण्यात आली.
विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत गुन्हेगारांची तपासणी केली गेली, दरम्यान, रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत का याची शहानिशा केली. हद्दीतील १७ ते २० गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक संपत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ३० ते ३५ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, दोन वाँटेड आरोपी ताब्यात घेण्यात आले. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ ते ३० गुन्हेगारांची तपासणी झाली. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना समज देण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० ते ३५ आरोपी तपासण्यात आले. फरारी आरोपींच्या घरची तपासणी केली; मात्र आढळून आले नाहीत.
यादीनुसार आरोपींची तपासणी
- गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला शहरातील सात पोलीस ठाण्याच्या वतीने व गुन्हे शाखेतर्फे कोम्बिंग आॅपरेशन केले जाते. कोम्बिंग आॅपरेशनच्या दरम्यान काही आरोपी आढळून येतात; मात्र ज्यांना याची माहिती मिळते व जे पोलिसांना हवे असतात असे आरोपी ४ ते ५ दिवस गायब होतात. कोम्बिंग आॅपरेशन नंतर मात्र आरोपी इतर वेळेत पुन्हा आढळून येतात. गुन्हे शाखेच्या वतीने यावेळी आरोपींची यादी काढली. यादीनुसार आरोपींची तपासणी करण्यात आली.