पारावरच्या गप्पा; राजकीय वायदे बाजार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:42 AM2019-04-03T11:42:42+5:302019-04-03T11:45:37+5:30
सोलापूर व माढा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आला वेग.
रविंद्र देशमुख
तालुक्यातील काम आटोपून शिरपा मुक्कामाच्या गाडीनं रात्री गावाकडं आला होता. आता आचारसंहिता अन् सारेच जण प्रचारात गुंतले असल्यामुळे त्याची मार्केटिंगची कामं ठप्प होती. त्यामुळे काही दिवस तो गावातच राहणार होता.. सकाळी नेहमीप्रमाणे उठून त्याने भरभर आपली शरीरधर्माची कामं आटोपली अन् थेट गावचा पार गाठला.. थोरले आबा, शेजारच्या आळीतील मल्लू, सरपंचाचा बाळू, दोन-तीन गावकरी पारावर येऊन बसले होते. शिरपाला बघताच आबानं त्याचं स्वागत केलं. शिरपानेही पायाला स्पर्श करून आबांचा आशीर्वाद घेतला. आबांनी त्याला शेजारी बसवून घेतलं अन् नवं-जुनं विचारलं.
शिरपा पारावर आला की गावातल्या मंडळींना नवं काहीतरी ऐकायला मिळतं.. त्यामुळे मल्लूनं विचारलं, शिरपा सांग काहीतरी नवं... तालुक्यात काय चाललंय?.. शिरपानं वायदे बाजाराची संकल्पना सांगितली. मोठ्या कंपन्या शेतकºयांना कशा बांधून घेत आहेत. रानातल्या पिकाची किंमत ठरवून पिकण्यापूर्वीच खळं कसं विकत घेत आहेत.. याची सारी हकिकत सांगितली... गावकºयांना मात्र ही संकल्पना काही समजत नव्हती... कंपन्या अस्सं कसं पिकं खरेदी करतात? वादळवारं, अवकाळीनं नुकसान झालं तर पैशाचा बोजा कसा सोसतात?.. तंबाखू मळत आबानं विचारलं.. मल्लूही म्हणाला, लका शिरपा, जरा समजून सांग की, सोप्पं करून सांग. शिरपा म्हणाला, जाऊ द्या, आबा या विषयावर आपण नंतर बोलू!... मला सांगा आपल्या गावात कुणाची हवा हाय? आपल्याकडचा मामा की फलटणचं निंबाळकर?... काय लई लोकं इकडच्या पक्षातून तिकडं गेलेत म्हणं?.. शिरपा विचारू लागला.
शिरपानं विषय बदलेलं आबांना पसंत पडलं नाही, जरा खेकसूनच ते म्हणाले, शिरप्या त्यो वायदे बाजार सांग. आपल्या काय फायद्याचा हाय का? उगं इषय बदलू नको... आता थोरले आबा खवळल्यानं शिरपाचा नाईलाज झाला अन् त्यानं इलेक्शनचा संदर्भ घेऊन वायदे बाजार सांगितला...
अकलूजकरांना मिळणार बक्कळ नफा !
शिरपा म्हणाला, आबा, आता तुम्हीच बघा, आपले थोरले अन् धाकले दादा कमळवाल्यांच्या पक्षात गेलं... होय तर, पण त्यास्नी काय मिळालं? तिकिटं तर त्या मिशीवाल्या फलटणकराला मिळालं.. मल्लूनं शिरपाचं बोलणं तोडलं. मल्लूचा प्रश्न ऐकून शिरपाचा चेहरा खुलला. आता त्याला वायदे बाजार समजावून सांगणं सोप्पं जाणार होतं. शिरपा उसळून म्हणाला, मल्ल्या, बरोब्बर इचारलास बघं... अकलूजच्या दादांना आता लगेच काय बी मिळणार नाय, पण गावात काय चर्चा हाय, तुला ठावं हाय ना?... की, थोरले दादा राज्यपाल अन् धाकले मागल्या दारानं खासदार!.. आबानं ही चर्चा ऐकली होती, ते प्रतिसाद देत म्हणाले, व्हय, व्हय शिरप्या. ऐकलंया आम्ही... शिरपानं आबांचा प्रतिसाद पाहून वायदे बाजार समजावून सांगितला... आता तुम्ही बघा आबा, दोन्हीबी दादानं कमळवाल्यांकडे जाताना काय तर मागितलं असंल की, गावकरी म्हणतात तशी त्यांनी दोन्ही पदं मागितली असतील. मग ही बोलीच झाली की!... ही पदं त्यांना नंतर मिळतील; पण कमळवाल्यांकडून वायदा तर केला ना!... म्हणजेच हा राजकीय वायदे बाजार झाला. आपला वायदे बाजारही तस्साच हाय की, पिकाची आधी बोली लावायची अन् पिकली की खळं कंपनीवाल्यांना देऊन नफा घ्यायचा!... व्हयं की रं शिरपा.. अकलूजकरांना बक्कळ नफा मिळणाराय बघ, आबा म्हणाले.
आता त्यांचंबी ‘कल्याण’ व्हनार का ?
आपल्या वाडीकुरोलीचं कल्याणरावबी कमळवाल्यांच्या गोटात गेले. त्यांचंबी कल्याण व्हनार का?.. हनमान देवळापासल्या बंड्यानं चर्चेत सहभागी होताना प्रश्न टाकला. शिरपा सांगू लागला.. व्हय, आता त्यांनीबी वायदा करून घेतलाच असेल की!... बंड्याला थोडं राजकारण कळत होतं, तो लगेचच म्हणाला, आता या वायदे बाजारात कल्याणाचं कल्याण कस्सं व्हनार?... शिरपा हुशार होता, त्याचा संपर्क दांडगा होता. त्यानं कल्याणरावांच्या वायद्याची माहिती घेतली होती. त्यामुळे बंड्याच्या प्रश्नावर तो म्हणाला, आरं सध्या तर कमळवाल्या कंपनीच्या सीईओ देवेंद्रपंतांनी त्यांना कारखान्याला मदत करण्याची बोली पक्की केलीय; पण पंढरपुरातून मतं चांगली पिकली तर माढ्याचं तिकीटही देण्याचा वायदा केल्याचं कळतं... अरे व्वा! बंड्या म्हणाला, व्हय व्हय आता समजलं, त्यांचंबी कल्याण व्हनार हाय !
विजयराजे अन् शंभूराजेंचा वायदा !
शिरपा आता अन्य दोन व्यवहारांबद्दल सांगू लागला.. आता बघा, शेटफळचे विजयराज अन् करमाळ्याचे शंभूराजे... शेटफळकरांना आमदारकी मिळण्याचा सध्यातरी प्रश्न नाही. कारण मतदार संघ राखीव आहे; पण त्यांना अनगरकरांच्या विरोधात स्ट्राँग व्हायचं; मग कमळवाले त्यांना बळ द्यायला तयार आहेत. त्यामुळे त्यांचाही वायदा फायद्याचाच आहे... आबांना हेही पटलं. करमाळ्यातही दीदी अन् प्रिन्सला टक्कर देण्यासाठी जगतापांना कमळवाल्यांचं बळ पाहिजेय. त्यामुळे त्यांनी शंभूराजेंच्या नावाने वायदे बाजार केला... आता बघू, पीक येतंय कस्सं अन् फायदा मिळतोय कस्सा ते!... शिरपानं आटोपतं घेऊन चर्चेला पूर्णविराम दिला.