Politics; माढ्यात चंद्रकांतदादा तर सोलापुरात जयसिध्देश्वर महास्वामी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 02:01 PM2019-02-18T14:01:51+5:302019-02-18T14:10:24+5:30
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना मैदानात उतरविण्याबाबत प्रदेश ...
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना मैदानात उतरविण्याबाबत प्रदेश भाजपाकडून चाचपणी सुरू आहे. सोलापूर मतदारसंघात विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचे नाव आघाडीवर आहे. बनसोडेंना पक्षांतर्गत विरोध झाल्यास गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांचे नाव पुढे येईल, असेही रविवारी सांगण्यात आले.
माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर भाजपाची कोंडी झाली आहे. पवारांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा गट नाराज आहे. या नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. पवारांविरोधात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना उमेदवारी दिल्यास पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, उत्तम जानकर आदी मंडळी सहकार्य करणार नाहीत, असे प्रदेश कार्यकारिणीतील नेत्यांचे मत आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिंदे आणि परिचारक यांच्या मदतीने जिल्ह्यातील नेत्यांची वेगळी मोट बांधली आहे.
चंद्रकांतदादांना मैदानात उतरविल्यास हे दोन्ही गट सहकार्याची भूमिका घेतील. या दोन्ही गटांना भविष्यातील आश्वासने देऊन बांधून ठेवायचे. करमाळा, माढा आणि माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील गटाचे नाराज कार्यकर्ते चंद्रकांतदादांना सहकार्य करतील, असा अंदाजही ज्येष्ठ सदस्यांनी प्रदेश कार्यकारिणीतील नेत्यांपुढे व्यक्त केला आहे. माढ्याबाबत भाजपा नेत्यांची लवकरच बैठक होणार आहे.
महास्वामींना वर्षा बंगल्यावरुन फोन आला अन्...
सोलापूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार म्हणून शरद बनसोडे यांना प्राधान्य देण्याचा विचार सुरू आहे. जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी विरोध केल्यास डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामींचे नाव पुढे येऊ शकते. मागील आठवड्यात एका कार्यक्रमानिमित्त महास्वामी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार होती, मात्र त्यांचे बोलणे झाले नाही. दरम्यान महास्वामी आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. या कार्यक्रमानंतर महास्वामी सोलापूरकडे निघाले. सोलापुरात पोहोचल्यानंतर महास्वामींना वर्षा बंगल्यावर येण्याबाबत निरोप आला. महास्वामींना पुन्हा वर्षा बंगल्यावरुन बोलावणं येण्याची शक्यता आहे.
चंद्रकांतदादांवर सोलापूरची अतिरिक्त जबाबदारी
भाजपाने चंद्रकांत पाटील यांच्यावर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारी दिली होती. मात्र पवारांचे नाव चर्चेत आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चंद्रकांतदादांना सोलापूर जिल्ह्याची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले आहे. त्यांनी अद्याप होकार दर्शविला नाही.