राजकारण; ढेंगळे-पाटलांवरून सोलापूर महापालिकेत काळे - पाटील भिडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 12:46 PM2020-06-18T12:46:12+5:302020-06-18T12:52:33+5:30
मनपा उपायुक्तपदावरील नियुक्तीचे समर्थन आणि विरोधही
सोलापूर : महापालिकेच्या उपायुक्तपदी त्रिंबक ढेंगळे-पाटील यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या नियुक्तीवरून उपमहापौर राजेश काळे आणि नगरसेवक सुरेश पाटील एकमेकांना भिडले आहेत. ढेंगळे-पाटील यांच्या नियुक्तीला सुरेश पाटलांनी विरोध केला आहे. सुरेश पाटील यांनी पक्षाला विचारात न घेता पत्रकबाजी केली असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काळे यांनी केली आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. महापालिकेत एक अनुभवी अधिकारी हवा असल्याचा सूर जिल्हा प्रशासनातून निघतोय. सध्या उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रशासन अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी सोलापूर शहरात बराच काळ काम केले आहे. त्यांची पुन्हा मनपा उपायुक्तपदी नियुक्ती व्हावी, यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.
ढेंगळे-पाटील वादग्रस्त आहेत. त्यांची नियुक्ती करू नये. त्यांच्या कामाची चौकशी करावी. त्यांच्यावर कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उपमहापौर राजेश काळे मैदानात उरले. सुरेश पाटील हे साधे नगरसेवक आहेत. त्यांनी हे पत्र पाठवण्यापूर्वी महापौर, उपमहापौर यांच्याशी चर्चा केली नाही. सुरेश पाटलांचे लक्ष केवळ पैशावर असते. ढेंगळे-पाटील आमचा पक्ष चालवायला आणि सुरेश पाटलांचे घर चालवायला येणार नाहीत तर या शहराचे भले करण्यासाठी येणार आहेत.
जो अधिकारी सुरेश पाटलाला पैसे देत नाही तो त्यांच्या लेखी भ्रष्ट असतो. महापालिकेचा कारभार सुरेश पाटलांसारखे लोक चालविणार आहेत का? आमचा पक्ष ही गोष्ट किती दिवस खपवून घेणार? ढेंगळे-पाटील सोलापुरात यावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
मागील महिन्यात मी मनपा आयुक्तांविरोधात प्रस्ताव दिला. त्यावरून सभागृहाने मला कारणे दाखवा नोटीस दिली. सुरेश पाटलांना आमचा पक्ष नोटीस बजावणार का? हे मी बघणार आहे. एका उपमहापौरावर कारवाई करता, मग नगरसेवकाबद्दल पक्षाचे धोरण काय? हे सुद्धा कळले पाहिजे.
- राजेश काळे, उपमहापौर
दीड वर्षांपूर्वी मी ढेंगळे-पाटील यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यावेळी राजेश काळे माझ्यासोबत होते. आता मात्र ते ढेंगळे-पाटलांची बाजू घेत आहेत. यातून कोण भ्रष्ट आहे हे जनतेला समजते. काळे हे नव्याने उपमहापौर झाले. मी ज्येष्ठ नगरसेवक आहे. पक्षाने मला विचारले तर मी उत्तर देईन; पण काळेंनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये.
- सुरेश पाटील, ज्येष्ठ नगरसेवक, भाजप.