महापालिका सभेत राजकारण ; स्वपक्षातील मंडळींवर सोलापुरच्या महापौर संतापल्या, आमचेच लोक विरोधकांना पुरवतात रसद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 02:21 PM2019-01-29T14:21:56+5:302019-01-29T14:25:22+5:30
सोलापूर : आमच्या पक्षातील काही लोक विरोधकांना रसद पुरविण्याचे कारस्थान करतात. त्यांनी दिलेली कागदपत्रे दाखवून विरोधक सभेत माझ्यावर प्रश्नांची ...
सोलापूर : आमच्या पक्षातील काही लोक विरोधकांना रसद पुरविण्याचे कारस्थान करतात. त्यांनी दिलेली कागदपत्रे दाखवून विरोधक सभेत माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती करतात. खरं तर प्रश्न विचारणाºया नगरसेवकांनी आणि त्यांना रसद पुरविणाºयांनी मागचा इतिहास काढून पाहावा. सभागृहाचे कामकाज नियमाप्रमाणेच चालत आहे. चालत राहील, असा विश्वास महापौर शोभा बनशेट्टी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
महापालिका आयुक्तांकडून आलेली अनेक प्रकरणे सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर का येत नाहीत, असा प्रश्न काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला.
या प्रकरणांची यादी त्यांनी पत्रकारांना दिली. ही यादी सहसा नगरसेवकांना मिळत नाही. पण ती थेट काँग्रेसच्या हाती लागली. त्यावरुन कुजबूज सुरू झाली. त्याबद्दल महापौर शोभा बनशेट्टी म्हणाल्या, हे सगळं स्वपक्षातील लोकांचे कारस्थान असते. आमच्या पक्षातील लोक विरोधकांना रसद पुरवितात.
प्रशासनाकडून आलेल्या विषयांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार महापौरांना आहे. काही विषयांची पूर्ण माहिती घ्यावी लागते. पक्षाच्या बैठकीत काही लोकांनी हा मुद्दा काढला होता. तिथे त्यांची डाळ शिजली नाही. म्हणून मग विरोधकांना कागद पुरविले जातात. वास्तविक जे लोक प्रश्न विचारत आहेत त्यांनी प्रगतीपुस्तक काढून बघावे. ९० दिवस संपल्यानंतर विषय घेतले. मी आज सभागृहात सांगितलंय की मी खंबीर आहे.
कोरमवर प्रश्नचिन्ह, आयुक्तांवर आरोप
- महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे रजेवर होते. या सभेत अनेक नगरसेवक अनुपस्थित होते. सभेच्या कोरमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. नागणे-देशमुख वसाहत येथील ड्रेनेजलाईनचे काम तातडीने पूर्ण होत नाही. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे नागरिकांशी नीट बोलत नाहीत, असा आरोप विनायक विटकर यांनी केला. किसन जाधव यांनी आयुक्त राजकारण करीत आहेत, असा आरोप केला.
तौफिक शेख यांच्या सदस्यत्वासह इतर विषय प्रलंबित
- आयुक्तांकडून आलेल्या प्रकरणांमध्ये एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा अहवाल, बुधवार पेठ सफाई कामगार वसाहतीतील धोकादायक इमारत, मागासवर्गीय वस्ती सुधारणा योजनेतील कामांचे विविध प्रस्ताव, २५६ गाळे येथे सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत घरकुल बांधणे, शहरात रोड साईड लिटर बिन बसविणे, जलशुध्दीकरण केंद्र, जलतरण तलाव यांना मालाचा पुरवठा करणे आदी विषयांचा समावेश आहे. ही प्रकरणे सभेच्या अजेंड्यावर का घेतली असा प्रश्न काँग्रेसच्या नगरसेवकांनी विचारला.
सभेतील काही महत्त्वपूर्ण ठराव
- माजी आमदार युन्नूस शेख यांचा महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन सत्कार करण्यास मान्यता
- मिळकतकराचे आॅनलाईन पेमेंट केल्यास मिळणार पाच टक्के सवलत
- परिवहनकडील स्क्रॅप बसचा लिलाव होणार.
- परिवहनच्या बसच्या तिकीट दरात वाढ.