सोलापूर बाजार समितीचे राजकारण; आमदार देशमुख राजीनामा देतील, म्हेत्रेंना विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 01:08 PM2021-08-13T13:08:36+5:302021-08-13T13:08:43+5:30
विजयकुमार देशमुखांकडून सावधगिरीचे पाऊल, नराेळेंचा राजीनामा म्हेत्रेंच्या कार्यालयात पडून
साेलापूर : आमदार विजयकुमार देशमुख बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामा देतील. आम्हाला विश्वास आहे. अविश्वास ठराव दाखल करण्याची गरज पडणार नाही, असे काँग्रेसचे माजी आमदार सिध्दराम म्हेत्रे यांनी गुरुवारी सांगितले.
सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात सध्या उलथापालथ सुरू आहे. उपसभापती श्रीशैल नराेळे यांनी बुधवारी राजीनामा पत्र लिहून माजी आमदार सिध्दराम म्हेत्रे यांच्याकडे सादर केले हाेते. हे पत्र गुरुवारी सभापती विजयकुमार देशमुख यांच्याकडे सादर हाेईल, असे म्हेत्रे यांच्या निकटवर्तींयाकडून सांगण्यात आले हाेते. परंतु, नराेळे यांचे पत्र म्हेत्रे यांच्याकडेच राहिले. सिध्दराम म्हेत्रे म्हणाले, दाेन वर्षांपूर्वी आमदार देशमुख यांनी सहा महिन्यांसाठी सभापती हाेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे संचालक मंडळाने त्यांना संधी दिली. नराेळे यांनाही आम्ही उपसभापतीपद दिले.
आता संचालक मंडळातील लाेक दाेघांच्याही राजीनाम्याची मागणी करीत हाेते. आमदार देशमुख यांना निराेप दिला त्यावेळी त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखविली. पण अजूनही राजीनामा न दिल्याने संचालक मंडळातून वारंवार विचारणा हाेत आहे. संचालक मंडळाची नाराजी वाढल्याने श्रीशैल नराेळे यांच्याकडून राजीनामा घेतला, पण अद्याप सभापतींकडे दिला नाही. आम्ही आता सभापतींच्या राजीनाम्याची वाट पाहत आहाेत. आम्हाला त्यांच्याविरुध्द अविश्वास ठराव दाखल करायचा नाही. कारण ते स्वतःहून राजीनामा देतील असा विश्वास आहे. नवा सभापती काेण असेल यावरही विचार झालेला नाही. संचालक मंडळच याचा निर्णय घेणार आहे. आम्ही केवळ त्यांच्या भावना समाेर ठेवत आहाेत.
बैठकांचे सत्र सुरूच
आमदार विजयकुमार देशमुख नियमितपणे काही संचालकांच्या संपर्कात आहेत. विराेधी गटाकडून घडणाऱ्या घडामाेडींची माहिती त्यांच्यापर्यंत पाेहाेचत आहे. दुसरीकडे माजी आमदार सिध्दराम म्हेत्रे, दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांचे बैठकांचे सत्र सुरूच आहे. या घडामाेडींचा केंद्रबिंदू हसापुरेच असल्याचे दिसून येते. संचालक मंडळातील नाराज लाेक आणि विराेधी गटातील लाेकही हसापुरे यांच्या संपर्कात असल्याचे दिसून येेते.