५३९ जागांसाठी २६५ केंद्रांवर होणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:54 AM2021-01-13T04:54:49+5:302021-01-13T04:54:49+5:30
सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. मेथवडे, वाटंबरे, तिप्पेहाळी, गायगव्हाण, चोपडी या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. इतर ...
सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. मेथवडे, वाटंबरे, तिप्पेहाळी, गायगव्हाण, चोपडी या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. इतर १९ ग्रामपंचायतींच्या ६९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. आता ५६ ग्रामपंचायतींच्या ५३९ जागांसाठी १२१० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी २६५ केंद्राध्यक्ष, २६५ सहाय्यक केंद्राध्यक्ष, ५३० मतदान अधिकारी, २६५ शिपाई तसेच २५ राखीव केंद्राध्यक्ष, २५ राखीव सहाय्यक केंद्राध्यक्ष, ५० राखीव मतदान अधिकारी, २५ राखीव शिपाई अशी १४५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रावर २६५ कंट्रोल युनिट, २६८ बॅलेट युनिट मशीन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मतदान केंद्रावर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास मतदान प्रक्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी कंट्रोल युनिट, बॅलेट मशीनचे २५ सेट राखीव ठेवण्यात आले आहेत.
२६५ वाहनांची सोय
५६ ग्रामपंचायतींच्या २६५ मतदान केंद्रावर मतदान अधिकारी, कर्मचारी, कंट्रोल युनिट, बॅलेट मशीन पोहोच करण्यासाठी १३९ एसटी बस, ११२ खासगी बस, ४ जीप, मतदान केंद्राना भेटी देण्यासाठी १० झोनल ऑफिसरची वाहने अशी २६५ वाहनांची सोय केली आहे. कोळा, जवळा, महूद, वासूद, अकोला, घेरडी ही सहा गावे संवेदनशील असल्याने प्रशासनाने या गावांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जीपीएस यंत्रणेसह तीन भरारी पथके तैनात केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले.