पावसाच्या सरी अंगावर झेलत सोलापुरात निघाली मतदान जनजागृतीची सायकल रॅली
By appasaheb.patil | Published: October 19, 2019 12:30 PM2019-10-19T12:30:31+5:302019-10-19T12:36:36+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा उपक्रम
सोलापूर : जिल्हा मतदान जनजागृती समिती व जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा परिषद व सोलापूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यामाने शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास मतदान जनजागृतीनिमित्त भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भर पडत्या पावसात हजारो विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते.
सोलापूर शहरातील चार हुतात्मा पुतळा येथून या सायकल रॅलीचा शुभारंभ केंद्रीय निवडणूक निरिक्षक विभू राज यांच्या हस्ते करण्यात आला. हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करणेच आला. सोलापूर शहर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे सर, व महानगर पालिका आयुक्त दीपक तावरे सर सपत्नीक सहभागी झाले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ सर, महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार सर, सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील , शिक्षणाधिकारी संजय राठोड , महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, स्वीप समिती सदस्य अविनाश गोडसे, उप शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, विस्तार अधिकारी अशोक भांजे, क्रिडा शिक्षक व समन्वयक अनिल पाटील, हुतात्मा पुतळा येथून सुरूवात झालेल्या सायकल रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जिल्हा परिषद, सात रस्ता , डफरीन चौक या मार्गाने काढण्यात आली.
सोलापूर शहरातील दोन हजार पेक्षा अधिक विद्यार्थी तसेच दक्षिण व उत्तर सोलापूर पंचायत समिती व तालुक्यांतील कर्मचारी सहभागी झाले होते. मतदानासाठी वेळ काढा...आपली जबाबदारी पार पाडा.. मतदान करा लोकशाही बळकट करा... घोषणांनी परिसर दणाणून गेला. हातात मतदान जनजागृतीचे संदेश असलेले फलक घेऊन हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केलेल्या आवाहनास शनिवारी पावसाच्या सुरू अंगावर घेत विद्यार्थी व नागरिक व कर्मचारी सहभागी झाले होते.