सोलापूर लोकसभेसाठी उद्या मतदान; मध्यप्रदेश पोलिसांसह ३ हजार पोलीसाचा असणार बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 10:45 AM2019-04-17T10:45:47+5:302019-04-17T10:46:54+5:30
लोकसभा निवडणुकीच्या मतदानानिमित्त शहरात मध्यप्रदेशसह अन्य भागातील अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त दाखल झाला आहे. मतदानासाठी ७७७ मतदान केंद्रे असून, तीन हजारांपेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानिमित्त शहरात मध्यप्रदेशसह अन्य भागातील अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त दाखल झाला आहे. मतदानासाठी ७७७ मतदान केंद्रे असून, तीन हजारांपेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
लोकसभेची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. बाहेरून एक पोलीस उपायुक्त, ९ सहायक पोलीस आयुक्त, १२ पोलीस निरीक्षक, ७0 फौजदार, ३५0 पोलीस कर्मचारी, ११00 होमगार्ड, गोंदिया व सोलापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे दोन तुकड्या शहरात दाखल झाल्या आहेत.
शहर पोलीस आयुक्तालयातील तीन पोलीस उपायुक्त, तीन सहायक पोलीस आयुक्त, १४ पोलीस निरीक्षक, ५0 फौजदार आणि १ हजार ८00 पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाºयांच्या राहण्याची सोय केगाव येथील ट्रेनिंग सेंटर, सिंहगड महाविद्यालय, विजापूर रोडवरील एसआरपीएफ कॅम्प आणि शहरातील सात पोलीस ठाण्यांच्या ठिकाणी करण्यात आली आहे.
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने जानेवारी २0१९ पासून २ हजार ४१५ आरोपींविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पाच सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अन्वये कारवाई करून येरवडा येथील जेलमध्ये रवानगी केली आहे.
२३ आरोपी जिल्ह्यातून तडीपार झाले आहेत. दारूबंदी कायद्यान्वये ६0१ गुन्हे दाखल झाले असून, ७८३ लिटर दारू जप्त केली आहे. या प्रकरणी ६४७ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शहरात वेगवेगळ्या भागात करण्यात आलेल्या ३८६ नाकाबंदीदरम्यान ९ हजार ५00 वाहनांची तपासणी झाली आहे. २३ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हत्यार कायद्याखाली २१ गुन्हे दाखल झाले असून, दोन पिस्टल, ४ चॉपर व कुकरी, २६ तलवारी, एक एअर गन, तीन चाकू असा एकूण २ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरात बंदूक, पिस्टल, गन आदी शस्त्र असलेले एकूण ५१२ परवानाधारक आहेत. ४२७ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत.
बाहेरील कर्मचाºयांना प्रशिक्षण
च्निवडणुकीनिमित्त शहरात दाखल झालेल्या पोलीस कर्मचाºयांना पोलीस आयुक्तालयाच्या वतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये मतदान बुथ केंद्राची माहिती, शहरातील संवेदनशील केंद्रे, संवेदनशील भाग तेथील परिस्थिती आदींची सखोल माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षणानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा बंदोबस्त लावला जाणार आहे. निवडणुकीसाठी बाहेरून एकूण १२३ वाहने भाड्याने घेण्यात आली आहेत.