क्यूआर कोडद्वारे शोधता येणार मतदान केंद्र, मतदान वाढविण्यासाठी सांगोला नगर परिषदेचा उपक्रम
By काशिनाथ वाघमारे | Published: April 28, 2024 08:23 PM2024-04-28T20:23:52+5:302024-04-28T20:24:30+5:30
निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार माढा लोकसभा मतदारसंघाकरिता येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे.
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सांगोला नगर परिषदेच्यावतीने क्यूआर कोडचा अभिनव उपक्रम राबविला आहे. यामुळे मतदारांना घरबसल्या क्यूआर कोड स्कॅन करून मतदान केंद्र शोधता येणार आहे.
निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार माढा लोकसभा मतदारसंघाकरिता येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. यादृष्टीने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे प्रयत्नशील असून, स्वीप कार्यक्रमांतर्गत सर्व स्तरावर जनजागृती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून सांगोला नगर परिषदेकडून सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता अभिनव उपक्रम राबविला आहे. याअंतर्गत सांगोला विधानसभा क्षेत्रातील मतदारांना घरबसल्या क्यूआर कोड स्कॅन करून मतदान केंद्र शोधणे सोईस्कर झाले आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २९९ मतदान केंद्र असून, एकूण ३,१२,४८८ मतदार आहेत.
एका क्लिकवर माहिती
क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर मतदार इपिक क्रमांक, वैयक्तिक तपशील किंवा मोबाइल क्रमांक यापैकी एकाची माहिती भरून एका क्लिकवर आपल्या मतदान केंद्राची माहिती त्वरित उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. याचा लाभ घेता येणार आहे.
सांगोला शहरात एकूण ३० मतदान केंद्रे असून, शहरी भागामध्ये मतदान केंद्रामध्ये होणाऱ्या वारंवार बदलाच्या अडचणी लक्षात घेता शहरी भागातील मतदाराला मतदान केंद्र शोधण्यास अडचणी येतात. शहरी भागातील मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधण्यासाठी क्यूआर कोडचा विशेष फायदा होईल.
- सुधीर गवळी, मुख्याधिकारी तथा प्रशासक, सांगोला