पंढरपुर तालुक्यात ३३१ केंद्रावर होणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:19 AM2021-01-15T04:19:19+5:302021-01-15T04:19:19+5:30
पंढरपूर : डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. पंढरपूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीसाठी ३३१ ...
पंढरपूर : डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. पंढरपूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीसाठी ३३१ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. यासाठी १ हजार ७३६ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूक अधिकारी, कर्मचारी संबंधित मतदान केंद्रावर रवाना झाले असल्याची माहिती प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार विवेक सांळुखे यांनी दिली.
सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ७२ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. जैनवाडी ग्रामपंचायतीसह १७ मतदान केंद्रांतील १५ प्रभागामधील १०० उमेदवार बिनविरोध झाले आहेत. निवडणुकीसाठी १ हजार ६५७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १ लाख ४ हजार ४१६ पुरुष मतदार व ९२ हजार १८ स्त्री मतदार तसेच इतर१ असे एकूण १ लाख ९६ हजार ४३५ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. नियुक्त निवडणूक अधिकारी कर्मचारी शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथून १४ जानेवारी रोजी मतदान साहित्य घेवून रवाना झाले आहेत. कर्मचा-यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी ३० एस.टी.बसेस व २७ जीपची व्यवस्था करण्यात आली होती.
---
सहा गावे अतिसंवेदनशिल
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी तालुक्यातील सहा गावे अतिसंवेदनशील आहेत. नारायण चिचोंली, कासेगांव, खर्डी, अजनसोंड, गोपाळपूर, शेटफळ, गादेगांव, वाखरी, भंडीशेगांव, भाळवणी, धोंडेवाडी, उपरी, पिराची कुरोली, सोनके, तिसंगी, रोपळे, चळे, रांझणी आणि खरसोळी ही १३ गावे संवेदनशील आहेत. यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
निवडणुका शांततेत पार पाडव्यात यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
---
पाच गावातील आठवडा बाजार रद्द.....
मतदान असलेल्या गावांतील बाजार रद्द करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढल्या आहेत. त्यानुसार तारापूर, बाभळगाव, पिराची कुरोली, शेळवे ही पाच गावात शुक्रवारी भरणारे आठवडा बाजार बंध ठेवण्यात येणार आहेत.
---
फोटो : १४ पंढरपूर १, २