गरीब अन् श्रीमंत सोलापूर...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 03:51 PM2019-11-18T15:51:00+5:302019-11-18T15:51:05+5:30
सध्या आमच्या हॉस्पिटलमध्ये मागील काही वर्षांपासून पाठदुखीने त्रस्त असणारे परंतु तरुण मुलं या आजारांनी त्रस्त असणारे पेशंट वाढलेले आहेत. ...
सध्या आमच्या हॉस्पिटलमध्ये मागील काही वर्षांपासून पाठदुखीने त्रस्त असणारे परंतु तरुण मुलं या आजारांनी त्रस्त असणारे पेशंट वाढलेले आहेत. काही नाममात्र गोळ्या दिल्या की या लोकांना फरक पडतो ...परंतु बघतो काय दर महिन्याला पाच-सहा असे तरुण मुलं पाठदुखी, कंबरदुखी मानदुखीने आमच्याकडे येतातच येतात. मग नीट हिस्ट्री घेतल्यानंतर लक्षात आलं की हे सर्व अतिशय महागड्या टू व्हीलर वापरतात. कुठल्या बरं.. सुझुकी गिक्सर, होंडा होर्नेट, अपाचे एक्स्ट्रीम, पल्सरचे मॉडिफाईड वर्जन, डुकाटी यामाहा !! तुम्हाला कल्पना आहे लाख लाख रुपयांच्या गाड्या असतात या.!!
पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की या गाड्या लाँंग ड्राईव्हसाठी आहेत. परदेशांमध्ये किंवा कुठल्या स्पोटर््स रेससाठी, व्हॅली रेससाठी, या पोस्ट बाईक खरंच चांगल्या आहेत.. परंतु सोलापूर सारख्या ठिकाणी जिथे रस्ते अरुंद झालेले आहेत, ट्रॅफिक जाम बºयापैकी असते, जवळच जायचे असते. त्या ठिकाणी अशा बाईक्स वापरून व चुकीच्या पद्धतीने बसून या मुलांच्या मान, पाठ, कंबर दुखतात. पण मला वाईट वाटतं त्यांच्या पालकांचं.. यांच्या आई वडिलांचे!
कसे काय हे मुलाचा बाळहट्ट पूर्ण करण्यासाठी मरमर करतात.. मुलं ना अशा महागड्या गाड्या घेऊन देतात खरंच कमाल आहे हे!!
विषय हा आहे की, गाडी वापरावी किंवा न वापरावी, पण सोलापूरसारख्या गजबजलेल्या ठिकाणी अशा गाड्या घेऊन फिरणं म्हणजे खरंच तुमची मान, पाठ दुखणारच दुखणार. बरं हे आमचे साहेब किक मारून देखील सुरुवात करू शकत नाहीत!! बटन स्टार्ट गाड्या आहेत म्हणून आमचे पहिलवान लोक या गाड्या वापरतात.
बघा विचार करा तब्येत चांगली असेल ..भरभक्कम राणादादा असेल तर अशा गाड्या वापरण्यासाठी काही हरकत नाही ..पण गाडी आणि तो व्यक्ती एकमेकांना सूटेबल असतील परंतु निवळच चिपाड माणूस, पाप्याच पितर असणारा, छातीचा सापळा झालेल्या माणूस जेव्हा बटन स्टार्ट असणाºया अशा मोठ्या बाईक घेऊन फिरतात तेव्हा ते बघून खरंच वाईट वाटतं.. जाऊ दे आपण कशाला लक्ष द्यायचं ..आपण भलं व आपली स्प्लेंडर, एक्टिव्हा गाडी भली.. बरोबर? मला आठवतं, लहानपणी शाळेमध्ये हे ज्यांचे वडील स्प्लेंडर गाडीवर मुलांना कधी शाळेत सोडायला आले की आम्ही सर्वजण त्या स्प्लेंडरवर तीन-तीन, चार-चार छोटी मुलं बसून चक्कर मारण्यासाठी त्यांच्या मागे लागायचो.. त्याकाळी टू व्हिलर म्हणजे फार मोठं सुख असायचं परंतु आज तेच माझे शाळेतले मित्र हफ्त्यावरती किंवा वडिलांचा डोकं खाऊन अशा महागड्या स्पोर्ट बाईक घेऊन फिरतात ते बघून वाईट वाटतं.. चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासून करायची आपलं ठरले ना तसं ..म्हणून आपण तरी त्या वाटेला जायचं नाही.. बरोबर ..?
- डॉ. सचिन कुलकर्णी