पंढरपूर बंधार्यातील पाण्याला दुर्गंधी
By admin | Published: June 3, 2014 12:48 AM2014-06-03T00:48:31+5:302014-06-03T00:48:31+5:30
शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात : पाणी सोडण्यासाठी हवा जलसंपदा मंत्र्यांचा आदेश
पंढरपूर : पंढरपूर शहर, सांगोला व शिरभावी या पाणीपुरवठा योजनांना पाणी पुरविणार्या पंढरपूर बंधार्यातील पाण्याला दुर्गंधी सुटली असून, पाण्याला हिरवा रंग आला असला तरी हेच पाणी शहरवासीयांना पाजण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशाने हे पाणी सोडण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात पंढरपूर बंधार्यातील पाणी कमी झाले म्हणून गुरसाळे बंधार्यातील पाणी या बंधार्यात सोडण्यात आले. त्यामुळे पुढील चार दिवसांची पाण्याची सोय झाली. सध्या या बंधार्यातील पाणी हिरवेगार झाल्याचे दिसत असून, पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. पाण्यात अळ्या व किडेही दिसत आहेत. हेच पाणी शहरवासीयांना शुद्धीकरण करून पिण्याची वेळ आली आहे. भीमा नदीवरील बंधारे कोरडे पडले असून, नदीकाठच्या गावांच्या पाणीपुरवठा योजनाही ठप्प झाल्या आहेत. शेतकर्यांची नदीकाठची मुलासारखी जपलेली पिके पाण्यावाचून जळू लागली आहेत. उजनी धरणातून १ जूनला पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणार्या औज बंधार्यात पाणी असल्याने पाणी भीमा नदीत सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. सध्या उजनी धरणाच्या उजव्या व डाव्या कॅनॉलला शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. येत्या चार दिवसांत तरी ही पाणीपाळी बंद होणार नसल्याने भीमा नदीत पाणी सोडणे अवघड झाले आहे. सध्या दोन्ही कॅनॉलचे पाणी चालू आहे. नदीत किमान ५ ते ६ हजार क्युसेक्सने पाणी सोडावे लागते. त्यामुळे पाणीपातळी कमी होऊन कॅनॉलला पाणी कमी होते. -
---------------
उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदामंत्री सुनील तटकरे मंगळवारी घेणार आहेत. मंगळवारी मुंबईत बैठक बोलावली असून, त्यांनी आदेश दिला की, लगेच पाणी उजनीतून भीमा नदी पात्रात सोडले जाईल. —अजयकुमार दाभाडे, अधीक्षक अभियंता, भीमा पाटबंधारे