साठीतली थकलेली पावलंही डीजेवर मनसोक्त थिरकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 01:23 PM2019-06-25T13:23:16+5:302019-06-25T13:26:58+5:30
सोलापूर लोकमत सखी मंच; धूत सारीज्, राजमुद्रा लाईफ स्टाईल यांचा संयुक्त उपक्रम
सोलापूर : धुरकट प्रकाश आणि त्या प्रकाशातून दिसणारी एक भयानक आकृती हळूहळू पुढे सरसावत होती. त्या आकृतीचे ते शब्द अंगावर शहारे आणत होते आणि ती जवळ येताच हे काय...? कोई है. हा प्रसंग होता लोकमत सखी मंच आयोजित ‘डीजे’ पार्टीमध्ये हॉरर शोचा. विशेष म्हणजे या पार्टीत वार्धक्याने थकलेली पावलेही डिजेवर मनसोक्त थिरकली.
लोकमत सखी मंचने श्री धूत सारीज् आणि राजमुद्रा लाईफ स्टाईल यांच्या सहयोगाने वेन्यू पार्टनर विजापूर रोड येथील हॉटेल मयूर वन येथे आयोजित ही डी. जे. पार्टी रविवारी संध्याकाळी खास सखी सदस्यांसाठी आयोजित करण्यात आली. यावेळी ‘शु ऽऽ कोई है’ ही हॉरर थिमवर विशेष स्पर्धा घेण्यात आली.
नेहमीच सुंदर सुंदर वेशभूषा आणि केशभूषा करून आपली अंगभूत कला सादर करणाºया सखींनी या वेळेला या हॉर्रर थिमला साजेशी तयारी केली होती. स्पर्धकांनी तेवढ्याच ताकदीने आणि कलात्मकतेने सख्यांसमोर आपली कल्पना सादर करताना सामाजिकतेचे भान ठेवले हे विशेष.
या डी. जे. पार्टीचा प्रारंभ उपस्थित मान्यवरांचे स्वागत, सत्कार करून करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर श्री धूत सारीज्चे पुरुषोत्तम धूत, राजमुद्रा लाईफ स्टाईलचे रंजित हजारे, हॉटेल मयूर वनचे सोमनाथ स्वामी, अॅस्ट्रो किड्सच्या राजश्री भादुले यावेळी उपस्थित होत्या. त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर डी. जे. पार्टीला प्रारंभ करण्यात आला. विलोभनीय असा डी. जे. सेटप, विविध रंगांचे एलईडी लाईट्स, गीतांच्या बोलावर थिरकणारे शार्फी आणि सर्वत्र पसरलेल्या धुराचे साम्राज्य आणि त्याच्या जोडीला एकामागून एक ठेका धरायला लावणारे गीताचे बोल, या सर्वांमध्ये सख्यांनी दिवसभराचा ताणतणाव विसरून आणि भान हरपून नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. स्पर्धेत सहभागी चित्रविचित्र आकृतींनी ‘शांताबाई’ या नृत्यावर ठेका धरला. हे बघून उपस्थित सख्यांना आपले हसू आवरता आले नाही.
सोबतीला स्नॅक्स, नृत्य, सेल्फी, अचानक गेम या सर्वांमध्ये घरी जायची वेळ कधी झाली हे कळलेच नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक मिमिक्री आर्टिस्ट सागर राठोड यांनी केले.
हॉरर वेशभूषेतील विजेते स्पर्धक
- अमृता नागटिळक (प्रथम), विजया कदम (द्वितीय), उमा मुंगळे (तृतीय), सोनी शर्मा (प्रोत्साहनपर), स्नेहा कुलकर्णी (प्रोत्साहनपर)