वडील दारू पितात म्हणून पोरगं निघून गेलं; पोलिसांच्या मदतीनं आईच्या कुशीत विसावलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:24 PM2020-09-15T12:24:49+5:302020-09-15T12:24:57+5:30
बार्शी तालुक्यातील घटना : मुलाला पाहताच मातेनं फोडला हंबरडा...
संजय बोकेफोडे
कुसळंब : वडिलांना दारू पिऊ नका म्हणत असतानाही दारू पिऊन दुचाकी चालवून अपघात घडविला़ त्यामुळे १० वर्षांचं पोरगं वडिलांना अपघातस्थळी सोडून निघून गेलं... पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे आठ तासांनंतर आईच्या खुशीत विसावलं.. पिंटू (काल्पनिक नाव, जि. अहमदनगर) त्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दीपक गेणू पवार याची लहान मुलगी आजारी असल्याने तिला बार्शी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे़ दवाखान्यात जास्त लोकांना राहण्यास जागा नसल्याने पिंटूचे वडील सासरवाडी (पिंपळगाव दे़) येथे जाताना पिंटूने वडिलांना तुम्ही आता दारू पिऊ नका, असे सांगितले़ मात्र वडिलाने दारू पिऊन दुचाकी चालविताना पडून जखमी होऊन बेशुद्ध पडले़ पिंटूही जखमी झाला़ तशा स्थितीतही आपले वडील माझे ऐकत नाहीत म्हणून निराश झालेला पिंटू अंधाºया रात्री धोत्रे गावापासून कुसळंबमार्गे बार्शीकडे निघाला. काही अंतरावर गेला़ कुसळंब टोलनाक्याजवळ आल्यानंतर त्याला भूक लागली, पण जवळ पैसे नाहीत़ आपल्याला कोण जेवण देणार, या चिंतेत होता़ पुढे चालत असताना एक हॉटेल दिसले़ हॉटेल मालकास मला भूक लागली आहे़ काहीतरी खायला द्या म्हणताच मालक अण्णा काशीद यांनी त्याला एक वडापाव व बिस्कीट पुडा दिला़ ते खाल्ल्यानंतर तू कुठला, कुठे चालला आहेस, अशी विचारणा केल्यानंतर गावचे नाव सांगून सर्व हकिकत सांगितली.
हा प्रकार पोलिसांना सांगताच घटनास्थळी पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन माने, महेश डोंगरे, रामदास साठे दाखल झाले़ त्या मुलाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सर्व हकिकत कळाली़ शिवाय माझी बहीण बार्शी येथील दवाखान्यात उपचार घेत असल्याचे सांगताच त्याला घेऊन पोलीस दवाखान्यात आले़ मुलाला पाहून त्या मातेने हंबरडा फोडला अन् पिंटू आईच्या खुशीत विसावला़ नंतर पिंटूच्या सांगण्यावरून त्याच्या वडिलास पोलीस ठाण्यात आणले़ यासाठी प्रवीण झांबरे, प्रवीण काशीद, रोहित शिंदे, प्रमोद ढोबळे, राजेंद्र काशीद, नाना गादेकर या खाकी वर्दीतील माणुसकीने सहकार्य करुन माणुसकी दाखवली.
अशी झाली ‘लोकमत’ची मदत
श्यामला भूक लागल्यानंतर कुसळंब टोलनाक्याजवळील हॉटेल मालक आण्णा काशीद यांनी त्यास खाऊ दिले़ नंतर सर्व चौकशी केली़ त्यानंतर काशीद यांनी ‘लोकमत’चे वार्ताहर संजय बोकेफोडे व पोलीस पाटील गणेश काळे यांना सांगितले़ हे दोघे घटनास्थळी दाखल होऊन बोकेफोडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांना ही घटना सांगितली़ त्यानंतर तो मुलगा आईच्या खुशीत विसावला़