सोलापूरच्या चित्रकाराने साकारलेले नरसिंहरावांचे पोट्रेट तेलंगणा विधानसभेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 04:04 PM2021-10-18T16:04:15+5:302021-10-18T16:04:21+5:30
‘केसीआर’च्या हस्ते अनावरण : अंबाजी चिट्याल यांचा गौरव
सोलापूर : सोलापुरातील एकेकाळचे व्यापारी स्वर्गीय सी. पापय्या यांचे बंधू अंबाजी चिट्याल यांनी साकारलेले माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे पोर्ट्रेट तेलंगणाच्या विधानसभेत झळकत आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते पोट्रेटचे नुकतेच उद्घाटन झाले.
अंबाजी चिट्याल हे आंतरराष्ट्रीय चित्रकार असून, सध्या ते हैदराबाद येथे स्थायिक आहेत. मूळचे ते सोलापुरातील भारतीय चौकातील रहिवासी आहेत. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तेलंगणाच्या विधानसभेत त्यांचा पोट्रेट लावण्यात आला. पी.व्ही. नरसिंहराव जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष खासदार केशव राव, नरसिंहराव यांची कन्या एस. वाणीदेवी, तेलंगणा विधानसभेचे स्पीकर पोचाराम श्रीनिवासराव, पर्यटक व सांस्कृतिक मंत्री श्रीनिवास गौड, गोपाल रेड्डी, एन.व्ही. नरसिंह राव आदी उपस्थित होते.
राव यांच्या परिवारातील सदस्यांच्या डोळ्यांत अश्रू
आंतरराष्ट्रीय चित्रकार अंबाजी चिट्याल यांनी सांगितले, नऊ बाय सहा फूट आकारात चित्र बनविले असून पोट्रेट तयार करताना पी. व्ही. नरसिंहराव यांच्या संबंधित चौदा भाषांतील साहित्य, आत्मचरित्र, सिनेमा नाटक अनेकदा पाहिले आणि वाचले तसेच जन्मगावास भेटी दिल्या.
त्यांच्या परिवारातील सदस्यांशी संवाद साधला. यासह इतर अनेक गोष्टींचा अभ्यास केला. त्यानंतर पोर्ट्रेट साकारले. पोट्रेट पाहिल्यानंतर राव यांच्या परिवारातील सदस्यांचे अश्रू अनावर झाले. मला आलिंगन देत भावनाशील झाले. माझे अनेकदा अभिनंदन केले. कौतुक केले. त्यांचं प्रेम मी आयुष्यभर विसरू शकत नाही. माझ्या आयुष्यातला हा सुवर्णक्षण आहे.
अंबाजी चिट्याल, चित्रकार