पॉश कपड्यांमुळं सापडला ‘सीरिअल किलर’!

By admin | Published: December 10, 2014 10:30 PM2014-12-10T22:30:16+5:302014-12-10T23:52:34+5:30

असा झाला तपास : कडेगावात मिळाला पहिला धागा; चित्रपटगृहातून आरोपीला अलगद उचलले...

Posh clothes found 'serial killer'! | पॉश कपड्यांमुळं सापडला ‘सीरिअल किलर’!

पॉश कपड्यांमुळं सापडला ‘सीरिअल किलर’!

Next

संजय पाटील - कऱ्हाड वडोली निळेश्वरमधील खून प्रकरणाचा तपास करताना पोलीस पथक बीड व लातूरपर्यंत पोहोचले. मात्र, तेथे धागेदोरे न मिळाल्यामुळे तपास पथकाने ‘यू टर्न’ घेत कऱ्हाडवर लक्ष केंद्रित केले. कऱ्हाडात परतलेले हे पथक एका ‘टीप’मुळे पुन्ह कडेगावात पोहोचले. तेथून या प्रकरणाचा पहिला धागा पोलिसांच्या हाती लागला. एका खुनाचा तपास करताना तब्बल तीन खून आणि एका महिलेवर खुनी हल्ला करणारा ‘सीरिअल किलर’ पोलिसांच्या जाळ्यात आला. पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांनी बुधवारी वडोली निळेश्वर खून प्रकरणासह इतर तीन गुन्ह्यांचा झालेला तपास पत्रकारांसमोर मांडला. या प्रकरणात तपासी पोलीस पथकाने केलेली कामगिरीही त्यांनी स्पष्ट केली. उपअधीक्षक घट्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडोली निळेश्वरमधील खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस पथकाने सुरूवातीला या खुनामागील कारण स्पष्ट करण्यावर लक्ष केंद्रित केले. चोरीच्या उद्देशानेच हा खून झाल्याची शक्यता बळावल्यामुळे पथकाने तपासाची चक्रे फिरवली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केलेल्या सूचनेनुसार चोरीच्या उद्देशाने यापूर्वी झालेल्या गुन्ह्यांची माहिती संकलित करण्यात आली. त्यातून जखिणवाडी, कऱ्हाडमधील जुना कोयना पूल, टिळक हायस्कूलनजीकची झोपडपट्टी व औंधमधील प्रत्येकी एका खुनाची घटना समोर आली. त्याचदरम्यान बीड व लातूरमध्येही अशाच पद्धतीने गुन्हे घडल्याचे उघडकीस आले. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, हवालदार सज्जन जगताप, खलील इनामदार यांचे पथक बीड व त्यानंतर लातूरला पोहोचले. तेथे तपास करण्यात आला. तेथून काहीही ठोस माहिती हाती न आल्याने पथक परत कऱ्हाडला आले. कऱ्हाडात लक्ष केंद्रित करून आरोपीचा शोध घेण्यात आला. मात्र, कऱ्हाडातूनही पोलिसांना जास्त काही हाती लागले नाही. दरम्यानच्या कालावधीत कडेगावमध्ये यापूर्वी घडलेला असाच एक गुन्हा समोर आला. संबंधित गुन्ह्यातील आरोपीला तेथील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. कऱ्हाडच्या पोलीस पथकाने त्या गुन्ह्याची माहिती घेतली. त्यावेळी संबंधित गुन्ह्यातील आरोपी काशिनाथ काळे हा हजारमाचीचा रहिवासी असून तो सध्या जामिनावर बाहेर असल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यानंतर सुरूवातीला त्याने वडोली निळेश्वर येथील खुनाची व त्यानंतर कऱ्हाडातील जुना कोयना पूल व औंध येथील दोन खुनांची कबुली दिली. तसेच अन्य एका महिलेवर दागिन्यांसाठी खुनीहल्ला केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. खबऱ्यांकडून माहिती ओगलेवाडीसह हजारमाचीतील खबरींकडून काशिनाथ काळेचे सध्या राहणीमान बदलले असून त्याच्या अंगावर पॉश कपडे असल्याचे समजले. त्यामुळे वडोली निळेश्वरच्या गुन्ह्यात काळे याचाच हात असण्याची शक्यता वाढली. तो प्रभात चित्रमंदिरात चित्रपट पाहण्यासाठी आला असताना पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पथकाच्या बक्षिसासाठी शिफारस तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, हवालदार सज्जन जगताप, खलील इनामदार व चोरगे यांनी या प्रकरणाचा तपास चांगल्या पद्धतीने केला. त्यामुळे आरोपीकडून तीन खुनाचे व एका खुनी हल्ल्याचे असे चार गंभीर गुन्हे उघडकीस आले. या तपास पथकाला विशेष बक्षीस मिळावे, यासाठी शिफारस करणार असल्याचे उपअधीक्षक घट्टे यांनी सांगितले. दुचाकी, कुऱ्हाड, दागिने हस्तगत काशिनाथ काळे याने वडोली निळेश्वर येथील खुनासाठी वापरलेली दुचाकी व कुऱ्हाड पोलीस पथकाने त्याच्याकडून हस्तगत केली आहे. तसेच त्याने खून करून चोरलेले काही दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

Web Title: Posh clothes found 'serial killer'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.