पॉझीटिव्ह पती उपचारानंतर घरी; निगेटिव्ह पत्नी मात्र आजारीच...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:25 PM2020-06-03T17:25:31+5:302020-06-03T17:25:45+5:30
भवानीपेठेतील प्रकाराकडे नागरिकांनी वेधले लक्ष; आईच्या उपचारासाठी मुलाची पायपीट...
सोलापूर: आठवड्यापूर्वी सारीने पॉझीटिव्ह आलेला पती उपचारानंतर बरा होऊन घरी परतला आहे, पण निगेटीव्ह अहवाल आलेली पत्नी मात्र आजारीच आहे. तिच्यावर उपचार व्हावेत म्हणून मुलगा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे चकरा मारीत आहे.
गेल्या आठवडयात बाळीवेसमधील एका खाजगी हॉस्पीटलमधील रुग्ण पॉझीटिव्ह आढळले. त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. बीपीचा त्रास असल्याने भवानीपेठेतील एक महिला या रुग्णालयात अॅडमिट होती. त्यामुळे या महिलेसह तिला डबा देण्यास येणाºया पतीलाही ताब्यात घेण्यात आले होते.
प्रयोग शाळेकडून अहवाल आल्यानंतर उपचार घेणारी महिला निगेटिव्ह तर डबा देण्यास येणारा पती सारीने पॉझीटिव्ह निघाला. त्यामुळे त्याच्यावर आठ दिवस रुग्णालयात उपचार करून बरे झाल्याने सोडून देण्यात आले. वास्तविक त्यांची प्रकृती ठणठणीत होती. पण अहवाल पॉझीटिव्ह आल्याने खबरदारी म्हणून त्यांनी उपचार घेतला. पण पत्नीची तब्बेत खराबच आहे. रिर्पोट निगेटीव्ह आला म्हणून घरी पाठविण्यात आले आहे. आईला उपचारास दाखल करून घेण्यात यावे म्हणून मुलगा आता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे चकरा मारीत आहे. पण दखल घेण्यात येत नसल्याची कैफीयत त्यांने मांडली आहे.