सोलापूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल होणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 12:08 PM2022-01-17T12:08:50+5:302022-01-17T12:08:57+5:30
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती : प्रत्येक तालुक्यात दोन कोविड सेंटर सुरू
सोलापूर : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यात दोन कोविड सेंटर सुरू केले असून, शहर किंवा ग्रामीण परिसरात जे रुग्ण पॉझिटिव्ह येतील त्यांना घरी उपचाराची परवानगी असणार नाही. पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल होणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत, असे रुग्ण कोविड सेंटरमध्ये दाखल न होता घरीच उपचार घेत आहेत. अशांची संख्या जास्त असल्यामुळे प्रशासन कोविड रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात दोन कोविड सेंटर युद्धपातळीवर सुरू केले आहेत. पुढील आठवडाभरात आणखीन कोविड सेंटर सुरू होतील.
जिल्ह्यातील आठ ऑक्सिजन प्लांट भरून सज्ज आहेत. तीनशे दहा मेट्रिक टन ऑक्सिजनची उपलब्धता असून, जवळपास पाच दिवस पुरेल इतका ऑक्सिजन उपलब्ध आहे. सरकारी तसेच खासगी डॉक्टरांना ऑक्सिजन वापरण्यासंदर्भात आवश्यक काळजी घेण्याची सूचना दिली आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहीम गतिमान करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. १५ ते १८ वयोगटातील जवळपास ६० हजार किशोरवयीन मुलांना लस देण्यात आली आहे.
दररोज पंधराशे ते दोन हजार कोविड चाचण्या सुरू
अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले, सध्या दररोज पंधराशे ते दोन हजार कोविड चाचण्या सुरू आहेत. भविष्यात या चाचण्या तीन पटीने वाढतील. यासोबत प्रत्येक तालुक्यात तसेच शहरी भागात चोवीस तास कोविड चाचण्या सुरू राहतील. विशेष म्हणजे लसीकरण मोहीम आणखी गतिमान करण्यासाठी जिल्ह्यातील २१ हजार बचत गटांना सहभागी करून घेणार आहोत. प्रत्येक बचत गटाला लसीकरण मोहीम राबवण्याचे उद्दिष्ट दिले आहे. रविवारी यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील बचत गटांच्या प्रमुखांशी संवाद साधला आहे. त्यांनी लसीकरण मोहीम गतिमान करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्नशील असल्याची माहिती दिली.