उद्यान एक्स्प्रेसचा ताबा महिलांच्या हाती; लोकोपायलट, गार्ड, स्टेशन मास्तर, ट्रॅकमॅनही महिलाच
By Appasaheb.patil | Published: March 9, 2021 10:59 AM2021-03-09T10:59:35+5:302021-03-09T11:00:06+5:30
महिलांनी सांभाळली मध्य रेल्वेची धुरा
सोलापूर : महिला दिनाचे औचित्य साधत मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील बेंगलोर- मुंबई उद्यान एक्स्प्रेसचा ताबा महिलांच्या हाती सोपविण्यात आला होता. लोकोपायलट, गार्ड, स्टेशन मास्तर, तिकीट तपासनीस, हेल्पर, टेक्निशिएन, ट्रॅकमॅन, सुरक्षारक्षकासह इतर कामांसाठीही सोमवारी महिलांनीच पुढाकार घेतला होता.
कोरोनाचे अटी, नियम पाळत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. बेंगलोर-मुंबई (उद्यान) विशेष एक्स्प्रेसचे संचालन संपूर्णपणे सोलापूर विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी केले. यात लोकोपायलट म्हणून अनिता राज, गार्ड वैशाली भोसले, स्टेशन मास्टर रमिता कुमारी तसेच तिकीट तपासनीस, हेल्पर, टेक्निशिएन स्टाफ, ट्रॅकमॅन आणि सुरक्षारक्षकासहित महिला कर्मचारी कार्यरत होते. तत्पूर्वी महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्षा प्रतिभा गुप्ता यांनी विभागीय रेल्वे प्रबंधक शैलेश गुप्ता यांच्या उपस्तिथीत हिरवा झेंडा दाखवून विशेष (उद्यान) एक्स्प्रेस सोलापूरहून रवाना केली.
विभागीय कार्यालयातील कार्यक्रमास कर्मचारी लाभ निधीचे मान्यताप्राप्त युनियनचे व असोसिएशनचे सदस्य संजय पवार, राजेश सिडगिड्डी, सचिन बनसोडे, शारदा सिन्हा, कल्याण संगटनेच्या कार्यकारी सदस्या, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी सुरेंद्र सिंग बाहिरट, मंडल कार्मिक अधिकारी रमेश अय्यर, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे आणि सर्व शाखा अधिकारी व महिला कर्मचारी उपस्थित होते.
महिला कर्मचाऱ्यांचा गौरव...
महिला दिनानिमित्त विभागीय कार्यालयात विविध कार्यक्रम व झूम अॅपच्या माध्यमातून सेमिनार आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. ज्योती चिडगूपकर यांनी महिला स्वास्थ्य विषयावर मार्गदर्शन केले. महिला दिनापूर्वी चित्रकला, निबंध, रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन महिलांसाठी करण्यात आले होते. सर्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कोरोना काळात उल्लेखनीय सेवा देणाऱ्या सोलापूर विभागातील महिला कर्मचाऱ्यांना विभागीय रेल्वे प्रबंधक शैलेश गुप्ता यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.