तिसऱ्या लाटेची शक्यता; अंगणवाडी, प्राथमिक शाळेतील मुलांची होणार रक्ततपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 02:13 PM2021-05-28T14:13:41+5:302021-05-28T14:13:46+5:30
तिसऱ्या लाटेआधीच मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणार
सोलापूर : तिसऱ्या लाटे आधीच जिल्ह्यातील अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे उपस्थित होते. जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती व संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीबाबत पालकमंत्री भरणे यांनी माहिती घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले तिसर्या लाटेत बालकांना बाधा होण्याची वाट न पाहता जिल्हा आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सुरू केल्या आहेत.
जिल्ह्यातील अंगणवाडी व प्राथमिक शाळांतील मुलांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. या मुलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यावरून मुलांची प्रतिकारशक्ती कमी होण्या आधीच उपाययोजना केल्या जाणार आहेत. तसेच जिल्ह्यात बालकांचे कोवीड सेंटर सुरू करण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी तज्ञांची मदत घेण्यात आली आहे. झिरो ते तीन वर्षे वयोगटातील मुले घरी आईजवळ असतात व तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुले अंगणवाडीत असतात. सध्या कोरोनामुळे अंगणवाड्या बंद असल्या तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे त्यांच्यावर लक्ष आहे. त्यानंतर पहिली ते दहावीपर्यंतची मुले शाळेत असतात. झिरो ते तीन वयोगटातील मुलांना बाधा झाल्यास हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करणे जिकरीचे होणार आहे. अशी मुले आई जवळच राहत असल्याने त्या अनुषंगाने तयारी करण्याचे नियोजन सुरू असल्याचे स्पष्ट केले. पालकमंत्री भरणे यांनी या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.