महापालिका स्थायी समिती सभापतीची निवड लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:32 PM2018-03-27T12:32:54+5:302018-03-27T12:32:54+5:30
तीन एप्रिलला पुन्हा होणार सुनावणी, अंदाजपत्रकाला विलंब टाळण्याचे प्रयत्न
सोलापूर: महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडीसाठी पुन्हा दि. ३ एप्रिलची तारीख देण्यात आल्याने सभापती निवड पुन्हा लांबणीवर गेली आहे. मात्र अर्थसंकल्पाला विलंब होऊ नये म्हणून महापौरांनी प्रशासनाला दस्तावेज सादर करण्याची मागणी केली आहे.
सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीबाबत अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयात विभागीय आयुक्तांच्या वकिलांनी दि. १९ मार्च रोजीच्या सुनावणीत मुदत मागितली होती. यावर न्यायालयाने सोमवार, दि. २६ मार्च ही तारीख दिली होती. सोमवारी महानगरपालिकेच्या वतीने पुन्हा मुदत वाढवून मागितली. त्यावर न्यायालयाने दि. ३ एप्रिल ही तारीख दिली आहे. दरम्यान, समिती सभापती नसल्याने अर्थसंकल्प लांबणीवर पडत आहे.
मुंबई महानगरपालिका अॅक्ट ३५-अ प्रमाणे अशा प्रकरणात विलंब होत असेल तर सर्वसाधारण सभेला अर्थसंकल्प सभा घेता येते. प्रशासनाला आपले बजेट सभेकडे पाठवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी महापौर शोभाताई बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल आणि सभागृह नेते संजय कोळी यांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे केली आहे. महापौरांच्या मागणीनुसार आयुक्त डॉ. ढाकणे यांनी नगर सचिव यांना प्रशासनाचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
बुधवारी सर्वपक्षीय बैठक
- स्थायी समितीचे सभापती नसल्याने यंदाचा महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यास विलंब होत आहे. अर्थसंकल्प सादर करण्याबाबत सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी बुधवारी महापालिकेत बोलावली आहे. बजेट एकमताने मंजूर होण्यासाठी सर्व गटनेत्यांशी चर्चा केली जाणार आहे.