मध्यभागी पडलेल्या खड्ड्यांमुळे पूल बनला धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:15 AM2021-06-19T04:15:50+5:302021-06-19T04:15:50+5:30
इंदापूर- जत महामार्गावरील महूद- सांगोला रोडवरील चिंचोली (ता. सांगोला) येथील पुलावर पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे मध्यभागी मोठमोठे ...
इंदापूर- जत महामार्गावरील महूद- सांगोला रोडवरील चिंचोली (ता. सांगोला) येथील पुलावर पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे मध्यभागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या संरक्षक लोखंडी पाइपही गायब झाल्या आहेत. या महामार्गावर जड अवजड खाजगी वाहने, दुचाकीची मोठी रहदारी आहे. रात्री- अपरात्री बाहेरगावच्या दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना पुलावर साचलेल्या पाण्यातील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे मध्यभागी वाहने अडकून पडतात, तर जीवघेण्या खड्ड्यांमुळे दुचाकीचे अपघात घडत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या या खड्ड्यात मुरूम टाकून मलमपट्टी केली आहे. मात्र, पुलावर साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे; अन्यथा ‘ये रे माझ्या मागल्या’ या म्हणीप्रमाणे पुन्हा दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना जीवघेण्या खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे.
स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे
पुलाच्या परिसरात काटेरी झाडेझुडपे वाढल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. दरम्यान, या रस्त्याच्या १३ कि.मी. दुरुस्तीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे १० कोटी रुपये मंजूर केले आहेत; परंतु अद्यापही काम सुरू झाले नाही. हा पूल बांधून खूप वर्षे उलटून गेल्यामुळे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे.
खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले
इंदापूर- जत हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे वर्ग केल्याने संबंधित अधिकारी या रस्त्याच्या दुरुस्ती, देखभालीकडे दुर्लक्ष करीत आहेत. गतवर्षी पावसाळ्यात या पुलाच्या मध्यभागी व परिसरात पाणी साचल्याने मोठमोठे खड्डे पडले होते. ते चालूवर्षी पावसाळ्यापूर्वी बुजवून घेणे गरजेचे होते. मात्र, तात्पुरती मलमपट्टी केल्याने चालू पावसाळ्यात पुन्हा खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या पुलाच्या मध्यभागी खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी न करता पुलाची दुरुस्ती व परिसरातील खड्डे बुजवावेत, अशी मागणी माजी सभापती बाळासाहेब काटकर यांनी केली आहे.
फोटो ओळ :::::::::::::::::
महूद- सांगोला रोडवरील चिंचोली पुलावर मध्यभागी व परिसरात मोठमोठे जीवघेणे खड्डे पडल्याचे छायाचित्र.