कट्टयावरील रिकामटेकड्यांना घरी बसवण्यासाठी ओतले तेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:22 AM2021-05-23T04:22:24+5:302021-05-23T04:22:24+5:30
चपळगाव : बहुतांश ग्रामपंचायतीकडून कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना राबवित आहेत. तरुणाईकडून याला प्रतिसाद मिळत नसल्याने चुंगी ग्रामपंचायतने गांधीगिरीचा मार्ग ...
चपळगाव : बहुतांश ग्रामपंचायतीकडून कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना राबवित आहेत. तरुणाईकडून याला प्रतिसाद मिळत नसल्याने चुंगी ग्रामपंचायतने गांधीगिरीचा मार्ग अवलंबला आहे. गावात सार्वजनिक ठिकाणी थांबणाऱ्या रिकामटेकड्यांना घरी बसविण्यासाठी ग्रामपंचायतीने सार्वजनिक ठिकाणी चक्क घाण काळपट तेल ओतले. कपडे घाण होतील या भीतीपोटी चुंगीकर आता घरी बसणे पसंत केले आहे.
कोरोनाने शहरापाठोपाठ ग्रामीण भागात हाहाकार माजवला आहे. दुसऱ्या लाटेत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात मृत्युदरात अक्कलकोट तालुका अग्रेसर आहे. ही सत्य परिस्थिती असली तरी ग्रामीण भागातील जनतेला ना लाॅकडाऊनची, ना कोरोनाची भीती.
चुंगी गावची लोकसंख्या जवळपास चार हजार. लाॅकडाऊनच्या काळात सार्वजनिक ठिकाणी बसणाऱ्या ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत व कोरोना प्रतिबंध समितीकडून जनजागृती करण्यात आली. मात्र जनतेकडून प्रतिसाद मिळाला नाही. वारंवार सांगूनदेखील गावातील मंदिर, जिल्हा परिषद शाळा, सार्वजनिक ओटा, कट्ट्यावर घोळका करून बसण्याचे प्रमाण वाढले. यामुळे गावात कोरोनाचा प्रसार वाढला.
यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच, सदस्य व कोरोना समितीच्या कार्यकारिणीची बैठक झाली.
ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर साळुंखे यांनी सार्वजनिक ठिकाणी वेस्टेज ऑईल टाकल्यास गर्दी करून बसण्यावर आळा बसण्याची कल्पना सुचविली. यावर एकमत झाल्यानंतर ग्रामपंचायतीने तब्बल ५० लिटर वेस्टेज ऑईलची व्यवस्था केली.
या मोहिमेसाठी राजाभाऊ चव्हाण, पोलीस पाटील संतोष पाटील, व्यंकट काजळे, स्वामीनाथ कलकोटे, वृशाली माने, ज्योती लोहार, रत्नमाला चव्हाण, रुक्मिणी राठोड, रूक्मिणी साळुंखे, दयानंद काजळे, ज्ञानेश्वर कुंभार यांनी सहकार्य केले.
----
कोरोनाचा काळ भयानक आहे. या रोगाने कोणालाही माफ केलेले नाही. तरीही ग्रामीण भागातील ग्रामस्थ बिनधास्त राहताहेत. गावातील लोकांना याविषयी जाग आणण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वेस्टेज ऑईल ओतले. यामुळे संसर्ग थांबेल. कोरोनामुक्त चुंगीसाठी झटणार आहे.
- सारिका चव्हाण,सरपंच,चुंगी
---
ग्रामपंचायतीने सार्वजनिक ठिकाणी ऑईल ओतले ही बाब चांगली आहे. शासनाच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. गावात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत ही भीती होती. या युक्तीमुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यास मदत होणार आहे.
- मधुमती माने
ग्रामस्थ, चुंगी
---
पाहाता-पाहाता कट्टे रंगविल..
ग्रामपंचायत शिपाई धोंडिबा खंदारे यांनी एका हातात झाडू व एका हातात वेस्टेज ऑईल घेतले. सोबत सरपंच सारिका चव्हाण, उपसरपंच महादेव माने, ग्रामसेवक मारूती सुरवसे आणि इतर सदस्य निघाले. गावातील बहुतांश सार्वजनिक ठिकाणी. बघता बघता या टीमने गावातील सार्वजनिक ठिकाणी ऑईल ओतून झाडून पसरविले. यामूळे आता चुंगीकरांना सार्वजनिक ठिकाणी बसण्याची सोयच नसल्याने प्रत्येकजण घरीच राहणे पसंत करत आहेत.