वीज कनेक्शन तोडले; पाच शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:28 AM2021-07-07T04:28:14+5:302021-07-07T04:28:14+5:30
सोलापुरातील सहस्त्रार्जुन मंगल कार्यालयात दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर शासकीय कार्यालयासाठी इमारत भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून या ...
सोलापुरातील सहस्त्रार्जुन मंगल कार्यालयात दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर शासकीय कार्यालयासाठी इमारत भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून या कार्यालयाची इमारत सरकारी कार्यालयासाठी वापरली जात आहे. यामध्ये माध्यमिक शाळांचे वेतन पथक व भविष्य निधी पथक कार्यालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा निरंतर शिक्षणाधिकारी कार्यालय, शाळा न्यायाधिकरण आणि सहायक कामगार आयुक्त यांचे कार्यालय या पाच कार्यालयांचा समावेश आहे.
सहस्त्रार्जुन मंगल कार्यालयाच्या मुख्य इमारतीत वीज वापर मोजणीचे मीटर आहे. कार्यालयाच्या व्यवस्थापनाने लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल भरलेले नाही त्यामुळे मंगळवारी सकाळी कार्यालयीन कामकाज सुरू झाले आणि वीज वितरण कंपनीने कनेक्शन तोडले. दुपारपर्यंत सरकारी अधिकाऱ्यांना याची कल्पना नव्हती; मात्र दुपारनंतर ही बाब समोर आली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज बिलाचा भरणा केल्याशिवाय वीज कनेक्शन जोडता येणार नसल्याचे सांगितले त्यामुळे मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाची धावपळ सुरु झाली
-------
दिवसभर कामकाज ठप्प
सकाळीच वीज गायब झाल्याने पाचही शासकीय कार्यालयातील संगणकीय प्रणाली बंद पडली. संपूर्ण कामकाज संगणकीय असल्याने दिवसभर या पाचही कार्यालयातील कर्मचारी बसून राहिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहस्त्रार्जुन मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक आणि महावितरणशी संपर्क साधून वीज जोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
-----
वीज बिलाचा भरणा वेळेत करायला हवा होता. याबाबतची आम्हाला पुरेशी कल्पना नव्हती त्यामुळे आज दिवसभराचा वेळ वाया गेला. उशिरापर्यंत बिलाच्या रकमेची तरतूद होईल अशी आशा वाटते.
- प्रकाश मिश्रा, अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक(माध्यमिक),सोलापूर