सव्वाशे ग्राहकांचे वीज कनेक्शन कापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:21 AM2021-03-14T04:21:25+5:302021-03-14T04:21:25+5:30
औद्योगिक, घरगुती, शेतीपंप आदींची उत्तर सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून वीजबिल भरण्यासाठी कोणीही पुढे ...
औद्योगिक, घरगुती, शेतीपंप आदींची उत्तर सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून वीजबिल भरण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने थकबाकीचा आकडा वरचेवर वाढत आहे. थकबाकी भरण्याचे आवाहन करीत शासनाने शेतीपंपाच्या बिलात ५० टक्के सवलत दिली आहे. मात्र, घरगुती व शेतीपंपाची थकबाकी भरण्यासाठी ग्राहक शेतकरी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. बिल भरत नसल्याने सुमारे १२५ घरगुती व लघुउद्योगाचे कनेक्शन बंद करण्यात आल्याचे उत्तर सोलापूर तालुका वीज मंडळाचे उपअभियंता संतोष कैरमकोंडा यांनी सांगितले.
शेतीपंपाच्या थकबाकीवर ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्याचा फायदा उत्तर सोलापूर तालुक्यातील १३६ शेतकऱ्यांनी घेतला आहे. या शेतकऱ्यांनी ५० टक्केप्रमाणे रक्कम भरल्याने त्यांना तसे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. तालुक्यातील १३ हजार शेतकऱ्यांकडे १०४ कोटी चार लाख ८४५ रुपये एवढी थकबाकी असून यापैकी ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरावयाची आहे. ती भरली जात नसल्याने शेतीपंपाचे ट्रान्स्फार्मर बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
---
शेतकऱ्यांना अजब आवाहन
कारंबा उपकेंद्राअंतर्गत १० गावे असून या गावातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. वीज मंडळाची यंत्रणा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ४ हजार रुपये भरावेत, असे आवाहन केले आहे. शासन ५० टक्के वीजबिल भरुन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन करीत असताना कारंबा उपकेंद्राने ४ हजार रुपये भरण्याचे अजब आवाहन केले आहे.
---